नाशिक : २४ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास तब्बल ५८ किलो सोन्यावर धाड मारलेल्या वाडीवऱ्हे सोने लुटीतील आरोपींच्या हाती आलेला बख्खळ पैसा व त्यातच बंद केलेले मोबाइल यामुळे जंग जंग पछाडणाऱ्या पोलिसांच्या हाती अद्यापपर्यंत तरी काहीही हाती लागलेले नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़ विशेष म्हणजे या लुटीतील आरोपींची नावे कळूनही त्यांचा सुगावा लागत नसल्याने पोलीस अंधारातच चाचपडत असल्याचे दिसून येते आहे़ ‘झी’ गोल्ड नावाच्या कंपनीचे साठ किलो सोने (एक-एक किलो सोन्याचे बार) शिरपूरच्या रिफायनरीमध्ये अंधेरी येथील सिक्वेल सिक्युअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वाहन (एमएच ०२ सीई ४०१०) गुरुवारी(दि़२३) रात्री घेऊन निघाले़ शुक्रवारी (दि़२४) पहाटे तीन वाजेच्या सुमारास वाडीवऱ्हेजवळ पांढऱ्या रंगाची लोगान कारमधील पाच दरोडेखोरांनी ही गाडी अडवली़ या वाहनातील चौघांना पिस्तुलाचा धाक दाखवून ५८ किलो सोन्याची लूट करून पाचही दरोडेखोर फरार झाले़ या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मुंबईहून पकडलेल्या तिघा संशयितांकडून पोलीस कोठडीदरम्यान दरोड्यात प्रत्यक्ष सहभागी असलेले सलीम व रामचरण अयोध्याप्रसाद मिश्रा या दोघांची नावे व माहिती मिळाली़ तसेच यामध्ये उत्तरप्रदेशमधील आरोपींचा सहभाग असल्याचे उघड होऊन त्यानुसार सलीमचे रेखाचित्र तर मिश्राचा फोटोही गुरुवारी (दि़१४) प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धीसाठी देण्यात आला़ या दरोड्यात सहभागी असलेल्या सर्वच संशयितांची नावे उघड झाली असली तरी त्यांच्यापर्यंत पोलीस अद्याप पोहोचू शकलेले नाहीत़ या सोने लुटीतील आरोपींच्या शोधासाठी मुंबई क्राईम ब्रँच, ठाणे क्राईम ब्रँच व दहशतवादविरोधी पथकही सक्रिय झाले असूनही अद्याप प्रमुख म्होरक्यापर्यंत ते पोहोचू शकले नाहीत़ या आरोपींकडे पैसा मोठ्या प्रमाणात आला असून त्यांनी मोबाईलही स्विच आॅफ केल्याने त्यांचा सुगावा लागत नसून त्याच्यापर्यत पोहोचण्यास आणखीन कालावधीत लागणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़(प्रतिनिधी)
जंग जंग पछाडूनही सोने लुटीतील आरोपी लागेना
By admin | Published: May 20, 2015 1:43 AM