नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने दुपारी मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रा चौक येथे रास्ता रोको आंदोलन सुरू असताना शहरात विविध ठिकाणी पाच बसेस फोडण्यात आल्या. सुरक्षिततेच्या कारणास्तव सायंकाळी काही मार्गांवरील बसेस बंद करण्यात आल्या होत्या. राज्यात मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यामुळे ठिकठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला लक्ष्य करण्यात आले आहे. नाशिकमध्येही मंगळवारी पाच ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली. जत्रा चौकात दुपारी आंदोलन सुरू झाल्यानंतर शालिमार चौकात पहिली बस फोडण्यात आली. त्यानंतर काही वेळातच महात्मानगर, त्यानंतर सातपूर पोलीस ठाणे आणि नंतर चेहेडी येथे बसेसवर दगडफेक करण्यात आली. रात्री ८ वाजेच्या सुमारास रविवार कारंजा येथे टोळ्क्यांनी शहर बसवर दगडफेक केली.शाळांना सुटी नाही !नाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि. २५) नाशिक शहरासह जिल्हाबंदचे आवाहन करण्यात आले असले तरी शाळांना मात्र अधिकृतपणे सुटी नसल्याचे शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी सांगितले. मंगळवारी मराठा समाजाच्या संघटनांच्या वतीने महाराष्टÑ बंद असल्याचे अगोदरच जाहीर झाल्याने शहरातील बहुतांशी शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. अनेक शाळांमध्ये पालकांवर निर्णय सोपविण्यात आला होता. त्यानंतर आता बुधवारी (दि. २५) नाशिक बंदची हाक देण्यात आली असून, त्या पार्श्वभूमीवर शाळा मात्र अधिकृतरीत्या बंद राहणार नसल्याचे शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी कळविले आहे.
शहरात विविध ठिकाणी पाच बसेसचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 1:14 AM