नाशिक : गोट फार्मिंगचा व्यवसाय चालविताना त्यात तोटा झाल्याने सातपूर येथील व्यावसायिकाचा विश्वास संपादन करत कंपनीच्या नावाने सहा कोटींचे कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून ठाणे येथील दोघांसह इंदूरच्या एकाने दोन टक्क्यांप्रमाणे प्रोसेसिंग फीच्या नावाखाली १ काेटी २६ लाख रूपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशान्वये सातपूर पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध फसवणूक व ठकबाजी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सातपूर परिसरातील रहिवासी सुनील मोहन सरोदे ( ४६, रा. सातपूर ) यांचा शेळीपालनाचा ( गोट फार्मिंग) व्यवसाय आहे. त्यांना २०१९ साली या व्यवसायात काही प्रमाणात तोटा झाला होता. त्यांना व्यवसायासाठी कर्ज हवे असल्यामुळे संशयित विश्वजीत उर्फ संजय प्रभाकर चांदोरकर (५४, रा.ठाणे), अनुज विश्वजीत उर्फ संजय चांदोरकर (३२, रा. ठाणे), राम जांबेकर (४०, रा. इंदूर म.प्र ) या तिघांनी विश्वासात घेतले. त्यांच्या या कंपनीच्या नावाने सहा कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी प्रोसेसिंग शुल्कापोटी २ टक्क्यांनी रकमेची मागणी केली. २०१९ साली संशयितांनी सरोदे यांच्याकडून १ कोटी २६ लाख ७९ हजार रुपये घेतले. दरम्यान, खोटे कागदपत्रे बनवून कर्ज प्रकरण मंजूर करत असल्याचा बनाव केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयितांनी कुठल्याही प्रकारचे कर्ज मंजूर केलेले नाही व केवळ आपली फसवणूक केली, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट जिल्हा न्यायालयात दाद मागितली. जिल्हा व सत्र न्यायालयाचे सह न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने याप्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी सरोदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक एस. एस. जाधव हे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.