नाशिक- शहरातील बस सेवा चालवण्यात तोटा येतो असे म्हणणा-या राज्य परीवहन महामंडळाला नाशिक शहरात अन्य खासगी प्रवासी साधने बंद असताना उत्पन्न वाढीची संधी मिळाली होती. मात्र,पूर्व ग्रह दुषीत ठेवून येथे प्रवाशांना टाळण्यात आले. दुसरीकडे मात्र नाशिक शहरातील ७५ बस मुंबई आणि ठाण्याला पाठविण्यात आल्या. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.लॉकडाऊन काळात सर्व प्रवासी वाहने ठप्प होती. त्यात सार्वजनिक वाहतूकीचा देखील समावेश होता. मात्र जसे जसे लॉक डाऊनचे निर्बंध शिथील झाले जनजीवन सुरळीत होत गेले. ग्रामीण भागात एसटी बस सुरू झाल्या. आंतर जिल्हा आणि जिल्हा अंतर्गत सेवा सुरू झाल्यानंतर देखील नाशिक शहरात मात्र ही सेवा सुरू झाली नाही. शहरात रिक्षा आणि खासगी टॅक्सी (कॅब) सेवा बंद असल्याने प्रवाशांची अडचण झाली. सुूरूवातीला दुचाकीला प्रवासाची परवानगी देण्यात आली असली तरी त्यावर एकालाच परवानगी होती. डबलसिट असलेल्या मोटार सायकल स्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे नागरीकांना प्रवासाचे सक्षम साधन मिळत नव्हते. मात्र, या काळात देखील एसटीने बस सेवा सुरू करून प्रवाशांची अडचण दूर करण्यास स्वारस्य दाखवले नाही. या काळात एसटीला साथ देणा-या प्रामुख्याने कामगार वर्गाची मोठी अडचण झाली ती आजही कायम आहे.सामान्य कामगार हे बसनेच प्रवास करतात परंतु त्यांची सोय नसल्याने कारखान्यात कामगार देखील येऊ शकत नव्हते. मात्र, एसटीने अशा काळात व्यवहार्यता दाखवली असती तर प्रवाशांची अडचण दूर झाली असती आणि एसटीचा महसूल वाढला असता मात्र पूर्वग्रह दुषीत ठेवून नाशिकमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली नाही.एकीकडे ही सेवा सुरू करण्यासाठी तोटा आणि अन्य कारणे देणा-या महामंडळाने मुंबईत मात्र बेस्टच्या मदतीला धाव घेतली. लोकल सेवा बंद असल्याने आता अजूनही सेवा अपुरीच असल्याने मुंबईतील चाकरमान्यांना बस सेवा आधार ठरली. त्यांच्यासाठी राज्यभरातून महामंडळाने एक हजार बस धाडल्या आहेत. यात नाशिक शहरातील ७५ बस पाठविण्यात आल्या आहेत. यात ५० बस मुंबई सेंट्रल तर२५ बस ठाण्याला पाठविण्यात आल्या आहेत. तेथील प्रवाशांची सोय करणे गैर नाही मात्र, तेथील प्रवाशांची सोय मग नाशिकमधील सामान्य प्रवाशांवर अन्याय कशासाठी असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. महामंडळाच्या अधिका-यांना नाशिकचे वावडे का असा प्रश्न केल जात आहे.राज्य शासनाचे राज्य परीवहन महामंडळ असले तरी आता शासन आणि महामंडळाचा काही अर्थाअर्थी संबंध आहे का असा प्रश्न पडतो. नाशिकमध्ये सेवा न देता मुंबईला मात्र बस पाठविल्या जात आहेत. लॉक डाऊन काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसताना प्रवाशांची अडचण झाली. ही अडचण परिवहन महामंडळाला दुर करता आली असती. मात्र तसे झाले नाही. आता महामंडळ हे वेगळे न ठेवताशासनाचेच एक खाते असले पाहिजे. शासन महामंडळाविषयी नेमकी भूमिका घेत नसल्याने प्रवाशांचीच नव्हे तर एसटीच्या कर्मचा-यांची आर्थिक अवस्था बिकट होत आहे. त्यामुळे शासनाने एकुणच एसटी बाबत धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे.- प्रा. दिलीप फडके, ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ नेतेहे निर्णय कोण घेते?नाशिक शहरात बस सेवा चालवायची नाही असा निर्णय शासनाच्या अथवा महामंडळाच्या कोणत्या निर्णयाने घेण्यात आला. याबाबत आता प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत. काही प्रवासी संघटना आणि ग्राहक संघटना आता माहिती मागवणार आहेत. त्यामुळे महामंडळाच्या अधिका-यांना थेट उत्तरे द्यावी लागणार आहेत.