नाशिक : नाशिक शहरातून जाणाऱ्या सुमारे सहा किलोमीटर लांबीच्या व बाराशे कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाला आलेल्या खर्चाच्या वसुलीसाठी पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर करण्यात येत असलेल्या व वेळोवेळी टोलवाढीला देण्यात आलेल्या स्थगितीमुळे दिवसाकाठी बारा लाख रुपयांचे नुकसान होत असल्याने त्याची भरपाई राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावी, असा तगादा पीएनजी कंपनीने लावला आहे. गोंदे ते पिंपळगाव या सहापदरी राष्ट्रीय महामार्गासाठी घोटी व पिंपळगाव बसवंत या दोन ठिकाणी टोल नाके कार्यान्वित करण्यात आले असून, घोटीपेक्षा पिंपळगाव बसवंत येथील टोलची रक्कम अधिक आहे. त्यामागे नाशिक शहरातून जाणारा उड्डाणपूल कारणीभूत असून, या पुलाला बाराशे कोटी रुपये इतका खर्च आलेला आहे व त्याच्या वसुलीसाठी पिंपळगाव येथील टोलनाक्याच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव वेळोवेळी कंपनीकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला व त्याला मंजुरीही मिळत गेली, परंतु अंमलबजावणीच्या पातळीवर त्याला कायमच विरोध होत गेला.मे २०१४ मध्येदेखील वाढीव टोल वसुलीचा प्रस्ताव मंजूर झाला होता, परंतु लोकसभा व विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात नोंदणीकृत झालेले एम.एच. १५ व एम.एच. ४१ या वाहनांना तसेच टोलनाक्याच्या २० किलोमीटर परिघातील वाहनांना विशेष सवलत जाहीर करण्यास कंपनीला भाग पाडले होते. परिणामी कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात करण्यात आलेल्या करारानुसार कंपनीला दररोज बारा लाख रुपयांचे नुकसान कंपनीला सोसावे लागत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या नुकसानीची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भरपाई द्यावी असा तगादा कंपनीने लावण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी दरमहिन्याच्या शेवटी कंपनीकडून होणाऱ्या नुकसानीची आकडेवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सादर केली जात आहे.
दिवसाकाठी बारा लाखांचे नुकसान
By admin | Published: November 14, 2015 11:20 PM