लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दीड दशकापूर्वी जुळलेला नाशिकचा ऋणानुबंध मंगळवारी अकस्मातपणे संपुष्टात आला. पारंपरिक विचारांची परखड मते मांडून समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या अपर्णाताई रामतीर्थकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच नाशिकमधील घरात जणू आपल्याच घरातील कोणी व्यक्ती गेल्यासारखी हळहळ व्यक्त झाली.२००१ पासून त्या सामाजिक कार्यात कार्यरत होत्या. मात्र नाशिकशी त्यांचा ऋणानुबंध २००५ सालापासून आला. त्यावर्षी सर्वोदय चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरानगरच्या सामाजिक संस्थांनी त्यांना ‘आई’ या विषयावर बोलण्यासाठी सर्वप्रथम निमंत्रित केले होते. तेव्हापासून वर्षातून किमान १० ते १२ व्याख्याने त्या नाशिकला करीत होत्या. त्यातही गत पाच वर्षांत त्यांची लोकप्रियता शिखरावर पोहोचल्याने जिल्ह्याच्या विविध भागांमधून आणि विविध संस्थांकडून त्यांना सातत्याने निमंत्रणे जात असत. प्रामुख्याने चला नाती जपूया’, आईच्या जबाबदाºया, लव जिहाद या विषयांवर त्यांनीदोनशेहून अधिक व्याख्याने नाशकात दिली आहेत. तुटणारी घरं वाचली पाहिजेत, अनाथांना सहारा दिला पाहिजे आणि आपल्या घरातील मुलीबाळी अन् स्रियांनी कसे वागले पाहिजे, ही बाब अपर्णाताई अत्यंत परखडपणे मांडत.---------महिन्यातील चार-पाच दिवस वगळता अन्य सर्व दिवस एसटीने राज्यातील प्रत्येक शहर आणि तालुक्याचे गाव येथे प्रवास करून व्याख्याने देणाºया श्रीमती अपर्णाताई रामतीर्थकर यांचे व्याख्यान नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेत, तसेच शहरातील बहुतांश सभागृहांमध्ये विविध संस्थांच्या वतीने झाले होते. नाशकातील त्यांचे अखेरचे व्याख्यान गत डिसेंबर महिन्यात स्वामीनारायण मंदिरात झाले होते. त्यामुळे त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच नाशिकमधील समस्त माता-भगिनी आणि नागरिकांना दु:ख झाले. समाज माध्यमांवरून त्यांना हजारो नाशिककरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या नाशिकविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.
कटू सत्य बोलणारी माता हरपली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 9:36 PM