दिंडोरी : वणी - त्र्यंबकेश्वर येथे रोलेट गेमच्या जाळ्यात अडकवून मोठी रक्कम गमावलेल्या युवकाचे प्रकरण ताजे असतानाच दिंडोरीतील युवकाला रोलेट गेमच्या नादाला लावून त्याच्याकडून ७५ लाख रुपये वसूल केल्याच्या फिर्यादीवरून दिंडोरी पोलिसांनी चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून तीन संशयितांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, सागर रामचंद्र वसाळ (३०) रा. शिवाजीनगर, दिंडोरी या युवकाला ऑनलाइन रोलेट गेममधून भरपूर पैसा कमाविण्याचे आमिष दाखवून वसाळ यांना ऑनलाइन गेम खेळण्यास भाग पाडले. वसाळ यांनी गेम खेळण्याचे थांबविले असता हरलेले पैसे परत मिळतील. तू पैसेवाला होशील रोलेट गेम खेळणे थांबवू नको, यासाठी तुला उधार आयडी व पाॅइंट देतो, असे सांगून गेम खेळायला भाग पाडले. यावेळी धमक्याही देण्यात आल्या. याप्रकरणी कैलास शहा, कुमार त्रंबक जाधव, अकिल शेख, सचिन रमेश बागूल सर्व रा. ओझर मिग, तालुका निफाड अशा चौघांवर दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तीन संशयित यांना गजाआड केले आहे, तर कैलास शहा याचा शोध पोलीस घेत आहेत.