पथदीप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य
मालेगाव : शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर पथदीप बंद असल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य पसरत असून पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महानगरपालिकेने शहरातील बंद असलेले पथदीप सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
रिक्षाचालकांना शिस्त लावण्याची मागणी
मालेगाव : शहरात मोठ्या प्रमाणात भरधाव वेगात रिक्षा जात असून वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांना शिस्त लावावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सुसाट धावणाऱ्या रिक्षांमुळे पादचाऱ्यांना कट मारण्याचे प्रमाण वाढले आहे. रिक्षांसाठी असलेल्या थांब्यांवर रिक्षा न थांबविता पायी चालणाऱ्या लोकांना रिक्षा आडवी लावून रिक्षात बसण्यासाठी गळ घातली जात आहे.
सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची मागणी
मालेगाव : कॅम्पातील सार्वजनिक शौचालयांची मनपाकडून सवच्छता केली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. शिवाजीवाडी, मोची कॉर्नर, संत रोहिदास चाैक या भागातील सार्वजनिक शौचालयांना दरवाजे नाहीत. त्यांची वारंवार स्वच्छता केली जात नाही. संबंधितांनी शौचालयांची दुरवस्था थांबवावी, अशी मागणी मनसेचे कॅम्प शहराध्यक्ष मोहन कांबळे यांनी केली आहे. शिवाजीवाडीत पुरुषांसाठी २४, तर महिलांसाठी २४ शौचालये उभारण्यात आले आहे. जुन्या आणि पडक्या शौचालयांमुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे.
एकात्मता चौकासह सिग्नलची मागणी
मालेगाव : शहरात मोसम पुलावर सिग्नल बसविण्यात आले असून सिग्नलमुळे एकाच वेळी सुटणाऱ्या वाहनांमुळे कॅम्प रोड आणि शिवाजी पुतळा भागात वाहनांची गर्दी होते. कॅम्प रस्त्यावर एकात्मता चौकासह महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाजवळ सिग्नल बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मोसम पुलावर सिग्नल तोडून वाहनचालक सुसाट वेगात जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.