नाशिक – गेल्या काही दिवसांपासून शहरात चर्चेत असणाऱ्या आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडूनाशिक येथे पोहचले होते. हा लव्ह जिहाद नसून या दोघांचा विवाह सोहळा पार पडणारच असं बच्चू कडूंनी ठणकावून सांगितलं होतं. तसेच, लग्नाला विरोध करणाऱ्यांनाही सज्जड दम भरला होता. त्यामुळे या लग्नसोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र, अखेर त्या लग्नाचा पेच कायमचा मिटला असून तो लग्नसोहळा आता रद्द झाला आहे.
सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची मुलगी रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा मुलगा आसिफ यांचा विवाह नोंदणी पद्धतीने झाला. या विवाहाला काही लोकांनी विरोध केला. त्यानंतर बच्चू कडू यांनी दोन्ही कुटुंबीयांना पाठिंबा दिला. धर्म न बदलता विवाह करत असतील तर इतरांनी लुडबूड का करायची? ही काळाची गरज आहे. कोणत्याही गोष्टीला जातीधर्माचे वळण लावले जाते असं बच्चू कडू यांनी म्हटले होते. तसेच रसिकाच्या लग्नात मी उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आता हा लग्नसोहळा रद्द झाल्याने बच्चू कडूंचं ते स्वप्न अपूर्णच राहिलं, असं म्हणावं लागेल.
नाशिकच्या चांडक सर्कलवरील एका हॉटेलात ठरलेला हा विवाह सोहळा अखेर रद्द झाल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला आहे. यासंदर्भात मुलीच्या पालकांनी सांगितले की, समाजाला दिलेले पत्र व शब्द आम्ही पाळला. त्यामुळेच हा विवाह सोहळा रद्द केल्याचे त्यांनी सांगितले. तर, पालकांनी दाखवलेल्या सामंजस्याबद्दल समाजातील काही नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनी लग्नास दर्शवलेल्या पाठिंब्यामुळे अनेक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानुसार ठरलेल्या तारखेला विवाह होतो का?, झाला तर विवाहस्थळी राडा तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
काय आहे प्रकरण?
नाशिक शहरातील एका हिंदू समाजाच्या दिव्यांग मुलीसोबत मुस्लीम युवकाने स्वखुशीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वधु-वरांच्या उभय पक्षांना मान्य असल्याने लग्नपत्रिकाही तयार करण्यात आली. मात्र ही लग्नपत्रिका सोशल मीडियावरुन काही कट्टरवादी धर्मांध संघटनांनी व्हायरल करत प्रचंड दबाव वाढविला. यामुळे वधुपक्षाकडे समाजाच्या संघटनेकडूनही विचारणा झाली. अखेर वधुपित्याने लेखी देत हा विवाह रद्द करत असल्याचे संघटनेला कळविले आणि दोन्ही कुटुंबियांच्या आनंदावर विरजण पडले.
नाशिकमध्ये हिंदू समाजातील एका दिव्यांग मुलीसोबत शिकणाऱ्या मुस्लीम युवकाने लग्नासाठी स्वखुशीने तयारी दर्शविली. या तरुण-तरुणीचे कुटुंबदेखील एकमेकांच्या जुने परिचित आहेत. तरुणी दिव्यांग असल्याने तिला लग्नासाठी स्थळं येत नव्हती. तिच्यासोबत शिकणारा मुस्लीम युवक हे सर्व जाणून होता. त्याच्या संवेदनशील मनाने ही बाब हेरली आणि त्याने लग्नाचा मानस तरुणीच्या वडिलांकडे बोलून दाखविला. दोन्ही कुटुंबातील वडिलधारे एकत्र आले. त्यांची बैठक झाली आणि कोरोनाची साथ लक्षात घेता शासकीय नियमानुसार मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत शहरातील चांडकसर्कल परिसरातील एका हॉटेलमध्ये लग्नसोहळा करण्याचे ठरले. जवळच्या पाहुण्यांना लग्नपत्रिका सोशल मिडियाच्या माध्यमातून पाठविण्यात आली. दरम्यान, ही लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल झाली अन् त्यावर लक्ष गेले काही धर्मांध कट्टरवादी संघटनांचे. एका समाजाच्या काही संघटनांनी या लग्नाला विरोध दर्शविला. दरम्यान, वधु किंवा वर पक्षाकडून यासंदर्भात कोणाविरुद्धही पोलीस किंवा अन्य कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे अद्यापतरी तक्रार केलेली नाही.
‘लव्ह जिहाद’चा दिला रंग
वस्तुस्थिती समजून न घेता ‘लव्ह जिहाद’चा रंग देत राळ उठवली. परिणामी वधुपक्षाला त्यांच्या समाजाच्या संघटनेनेही विचारणा केली. दरम्यान, या दोन्ही कुटुंबियांचा लग्नाचा आनंद बाजूला पडला आणि मानसिक ताण-तणावाला त्यांना सामोरे जावे लागले. अखेर आपआपसांत त्यांनी चर्चा करत लग्नसोहळा रद्द करण्यात येत असल्याचा लेखी ‘निर्वाळा’ समाजाच्या संघटनेच्या अध्यक्षांकडे दिला.