नाशिक : शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या लव्हली महिला मंडळाचा ‘लव्हली हायटेक ग्रुप’ अज्ञात विकृत हॅकर्सकडून हॅक करण्यात आला असून, या ग्रुपच्या महिलांना मंगळवारी (दि. ११) सकाळच्या सुमारास त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर अश्लील पोस्ट सुरू झाल्याने ग्रुपमधील सर्वच महिलांच्या पायाखालील वाळू सरकली. महिलांनी एकमेकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ग्रुपमधील सर्वांचे भ्रमणध्वनी ‘स्विच आॅफ’ असल्याची सूचना कानी पडू लागल्याने महिलांना मोठा धक्का बसला. महिलांनी तत्काळ सायबर पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार कथन करीत तक्रार दिली आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील महिलांचा लव्हली व्हॉट्सअॅप ग्रुप अज्ञात विकृताने हॅक केली. त्यामधील महिलांना सर्रासपणे अश्लील संदेश टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे महिलाही बुचकळ्यात पडल्या. त्यांनी एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाइल क्रमांक बंद येऊ लागले. दरम्यान, एका महिला सदस्याच्या भ्रमणध्वनीवर सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास संबंधित अज्ञात व्यक्तीने हाय, हॅलो करीत स्वत:ची ओळख ओम अशी सांगत पाकिस्तानमधून असल्याचा मेसेज केला आणि थेट ‘आप इंडिया के कौनसे सिटी से हो जी’ अशी माहिती विचारली. महिलेने पुन्हा नाव विचारले असता त्या विकृताने ओम कुमार असे नाव रिप्लाय केले. महिलेने पुढे संवाद थांबवून तत्काळ इंटरनेट बंद केले आणि सायबर पोलीस ठाणे गाठून त्या अज्ञाताविरुद्ध तक्रार दिली. ग्रुप अॅडमिन महिला सदस्याने तत्काळ ग्रुपमधून सर्वांना लेफ्ट होण्यास सांगितले. ग्रुपमध्ये अचानकपणे सामील झालेल्या व्यक्ती थेट पाकिस्तानातील कशा असू शकतात? असा प्रश्नही महिलांना पडला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांकडून महिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत.
महिला मंडळाचा लव्हली ग्रुप विकृताकडून ‘हॅक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 1:57 AM