नाशिक - शहरात वातावरणातील उष्म्यात वाढ होत असतानाच काही उपनगरांसह नव्याने विकसित होत चाललेल्या वसाहतींमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने जलकुंभनिहाय नियोजनावर भर देण्यास सुरूवात केली असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणात सद्यस्थितीत ३९२६ दलघफू म्हणजे ७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दरम्यान, गंगापूर धरणात ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. आता शहरात वातावरणातील उष्मा हळूहळू वाढत असून कडक उन्हाच्या झळा बसण्यास सुरूवात झालेली आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही हळूहळू वाढत आहे. त्यामुळे, शहरातील काही उपनगरांसह नव्याने वसलेल्या वसाहतींमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. प्रामुख्याने, पंचवटी, नाशिकरोड आणि पूर्व विभागातील काही उपनगरांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे सांगितले जात आहे. ब-याच ठिकाणी पाण्याची वेळ दोन तासांची असतानाही एक ते सव्वा तासच पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र आहे तर काही ठिकाणी करंगळीएवढे पाणी येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे, नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढत असल्याने त्यात कमी पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
लवकरच पाणीपुरवठा सुरळीत
शहराच्या हद्दीलगतच्या नववसाहतींमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या काही तक्रारी येत आहेत परंतु, उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढत असल्याने शेवटच्या टोकापर्यंत होणा-या पाणीपुरवठा वितरणात अडचणी उद्भवत आहेत. मात्र, पाणीपुरवठा विभागामार्फत त्याबाबतचे नियोजन केले जात असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.- शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता, मनपा