नाशिक : पावसामुळे शहरात धोकादायक वाडे पडण्याचे प्रमाण वाढत असून, जवळपास वीस वाडे पडल्यानंतर महापालिका कृतिशील झाली असून, त्यामुळेच शनिवारी (दि.२४) अशोकस्तंभ येथील लक्ष्मी भवन या वाड्याची धोकादायक भिंत पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. भाडेकऱ्यांचा विरोध, त्यातच सुरू झालेला पाऊस आणि झालेली वाहतूक कोंडी यामुळे काही भाग अखेरीस तसाच ठेवावा लागला असून, पुढील आठवड्यात तो हटविण्यात येणार आहे.शहरातील गावठाण भाागात अनेक जुने वाडे असून, ते धोकादायक स्थितीत झाले आहेत. जागामालक आणि भाडेकरू यांच्या वादात अनेक वाडे वादग्रस्त ठरले आहेत. तसेच अनेक वाड्यांबाबत न्यायालयात दावेदेखील दाखल आहेत. अशोकस्तंभावरील लक्ष्मी भवन येथील वाडादेखील वादग्रस्त आहे. त्यासंदर्भातील न्यायालयीन लढाई सुरू असली तरी त्याची भींत धोकादायक झाली होती. तसेच काही भाग पडलाही होता. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने ही भिंत उतरवून घेण्याचे ठरविले. त्यानंतर शनिवारी (दि. २४) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास या वाड्याच्या धोकादायक भिंतीचा काही भाग हटविण्यात आला.महापालिकेच्या कारवाईच्या वेळी काही स्थानिकांनी विरोध केला असला कोणत्याही प्रकारचे घर अथवा निवासस्थान हटविण्यात आले नाही, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.दुपारी अचानक पाऊस सुरू झाला तसेच रस्त्यावर भिंत पडल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे महापलिकेने कामकाज थांबविले. महापालिकेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी नरसिंगे यांच्या नेतृत्वखाली ही कारवाई राबविण्यात आली.दोरीने ओढून पाडली भिंतमहापालिकेच्या वतीने सदरची कारवाई करताना एका दोराला हूक बांधून ते हूक भिंतीला अडकविण्यात आले आणि त्यानंतर दोरी जेसीबीने ओढण्यात आल्याने जोरदार आवाज झाला आणि भिंत पडली. ही कारवाई बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
अशोकस्तंभावरील धोकादायक वाड्याचा उतरवला भाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:23 AM