नाशिक : गेल्या आठवड्यात झालेल्या गारपिटीनंतर आता थंडीचा कडाका वाढल्याने नाशिककरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. या मोसमातील सर्वाधिक नीचांकी म्हणजेच ६.३ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली असून, पुढच्या काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता मेरी हवामान केंद्राकडून वर्तविण्यात आली.उत्तर भारतात आलेली थंडीची लाट महाराष्ट्रातही पसरल्याने राज्यातील अनेक भागांमधील पारा झपाट्याने खाली येत आहे. नाशिकमध्ये किमान तपमान ६.३ व कमाल तपमान २६.० अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १५ डिसेंबर २०१३ रोजी ६.५ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. पुढचे दोन-तीन दिवस वातावरण कोरडे राहणार असले तरी हवामानातील गारव्यामुळे दिवसभर हुडहुडी भरत आहे. गेल्या १३ व १४ डिसेंबर रोजी अनुक्रमे १८.३ व १३.० अंश सेल्सिअस तपमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र एकाएकी तपमान निम्म्यावर घसरल्याने थंडीचा कडाका वाढला आहे, तर हवेतील सापेक्ष आर्द्रता सकाळी ६८ व सायंकाळी ३३ टक्क्यांवर आल्याने दिवसभर थंडीचा जोर जाणवत होता. दरम्यान, अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना ठेवणीतील उबदार कपडे सोबत घेतल्याचे चित्र बघावयास मिळत होते. सायंकाळी ५ वाजेनंतर रस्त्यावरील बऱ्यापैकी कमी झाली होती, तर उबदार कपड्यांच्या दुकानांमध्ये गर्दी वाढली असल्याचे चित्र होते.
मोसमातील सर्वाधिक नीचांकी म्हणजेच ६.३ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद
By admin | Published: December 16, 2014 2:04 AM