१९८२ साली आम्ही त्र्यंबक दरवाजा येथे महाराष्ट्र मित्रमंडळाची स्थापना केली. त्या मंडळाद्वारे आम्ही राजेश चाटोरीकर, संजय निकम, प्रशांत खेळे, मनोज तावरे, जयंत दिंडे, उल्हास तमखाने, नितीन ढोळे, मुकेश झेंडे, धनंजय प्रभू आदी मित्रांनी गणेशोत्सव, शिवजयंती तसेच रक्तदान शिबिर, अन्नदान, ना नफा ना तोटा या तत्त्वावर दिवाळी सणाला मिठाई वाटप, शालेय गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके वाटप इत्यादी सामाजिक काम करीत असताना १९ जून १९८२ साली आम्ही शिवसेना या पक्षात सामील झालो व तन, मन, धनाने, निष्ठेने पक्षाचे काम करू लागलो. महानगरपालिका झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम बापू वावरे यांच्या विरोधात कोणताही राजकीय अनुभव नसताना आमचे शाखाप्रमुख राजेश चाटोरीकर यांना उभे केले. त्यावेळी वावरे यांची प्रचंड दहशत होती. आमच्यावर अनेक प्रकारचे दबावतंत्र वापरण्यात आले, पण आम्ही माघार घेतली नाही. बिनविरोध निवडणूक होऊ दिली नाही. आम्ही पडलो पण जिगरीने उभे राहिलो. त्यानंतर शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख केशवराव थोरात आमदारकीला उभे राहिले. त्यावेळी अब्दुल हमीद चौकात शाबीरभाई शेख यांची प्रचार सभा झाली. शाबीरभाई शेख हे माझ्या सारख्याकडे भोजन घेण्यासाठी आले. त्यांचे माझ्या घरी येण्यानेच मी स्वत:ला धन्य समजतो. त्यावेळचा काळ वेगळा होता. नेते कार्यकर्त्यांची जाण ठेवत असत. आम्ही कधीही पक्षाविरोधात काम केले नाही. आजही आम्ही शिवसेनेचा कोणताही उमेदवार असो त्याचे आम्ही काम करतो. युतीचेदेखील काम करतो. फक्त प्रसिद्धीपासून दूर राहतो. आता लोकशाहीची चेष्टा झाली आहे. शिवसेना पक्षात काम करताना तेव्हापासून आजपर्यंत एखाद्या घरगड्याप्रमाणे पडेल ते पक्ष कार्य केले आहे; मात्र आताची राजकीय परिस्थती बघता मन लावून काम करावेसे वाटत नाही, कारण पूर्वीसारखे प्रेम करणारे, निष्ठावंतांना बरोबर घेऊन चालणारे कोणीही राहिले नाही.-वामन तमखाने
आता निष्ठावंताची कदर होत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 1:00 AM
महानगरपालिका झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम बापू वावरे यांच्या विरोधात कोणताही राजकीय अनुभव नसताना आमचे शाखाप्रमुख राजेश चाटोरीकर यांना उभे केले.
ठळक मुद्देआठवणीतील निवडणूक