त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या कांबडपाडा येथील ब्रह्मगिरीच्या कड्यावरून उडी मारून तळेगाव येथील प्रेमी युगुलाने आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना रविवारी उघडकीस आली. कांबडपाडा येथे दोन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचे तळेगाव (त्र्यंबक)च्या पोलीसपाटलांनी रविवारी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याला कळविले. त्यानुसार पोलिसांनी जेथे प्रेमी युगुलाचे मृतदेह पडले होते तेथे जाऊन तपास केला. या प्रेमी युगलाची नावे संजू संतू लचके (२०) व भागाबाई रामा लचके (१९) दोघेही राहणार तळेगाव कांबडपाडा अशी आहेत. या दोघांचे प्रेम असल्याचे समजते. तथापि आपापसातील नाते संबंधामुळे दोघांमधील प्रेम यशस्वी होत नव्हते. त्यामुळे या दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पोलिसांनी पंचनामे करून जागेवरच शवविच्छेदन केले. तसेच अंत्यविधीही तेथेच करण्यात आले. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी व हवालदार मेघराज जाधव अधिक तपास करीत आहेत.
ब्रह्मगिरीवरून उड्या मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:50 AM