शैलेश कर्पे सिन्नरउघड्यावर शौचासाठी जाणाऱ्यांना अनेदा गुलाबपुष्प देऊन त्यांचे प्रबोधन करूनही उपयोग होत नसल्याचे पाहून नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने अनोख्या पद्धतीने शहरात बॅनर झळकावल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. या बॅनरवर ‘सैराट’फेम आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरूचे छायाचित्र वापरण्यासह तिच्या गाजलेल्या डायलॉगचा वापर मोठ्या खुबीने करून उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांना गर्भीत इशारा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.अनेक ठिकाणी लावण्यात आलेले ‘आर्ची’चे प्रबोधनात्मक बॅनर सोशल मीडियावर झळकू लागले आहेत. ‘ये खुळखुळ्या.. तुला शौचालयाचा वापर कर म्हणून मराठीत सांगितल्यालं कळत नाही व्हय. का इंग्लिशमध्ये सांगू’ आणि ‘ये रताळ्या.. आरं ऊठ की, तुला कितीदा सांगितलं उघड्यावर बसू नको ते. मराठीत सांगितल्यालं कळत नाही व्हय. का इंग्लिशमध्ये सांगू?’ अशा आशयाचे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. ठिकठिकाणी लावण्यात आलेले गर्भीत इशाऱ्याचे बॅनर स्वच्छ भारत अभियानासाठी किती उपयोगी पडतील ते माहीत नाही मात्र सोशल मिडियाने ते उचलून धरल्याने त्यांचा चांगला प्रभाव नक्कीच जाणवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे प्रबोधनात्मक बॅनर लावून पालिका प्रशासन थांबले नाही तर पालिकेचे मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास यांनी स्वत: या अभियानात सक्रीय सहभाग घेतला आहे. पहाटेच मुख्याधिकारी दूर्वास यांनी स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेवून सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली. अनेक ठिकाणच्या सार्वजनिक शौचालयांची दूरवस्था झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अनेक ठिकाणी भांडी फुटली आहेत, पाण्याचे हौद तुटले आहेत, वीजेची व्यवस्था नाही, वेळच्या वेळी साफसफाई होत नसल्याचे निदर्शनास आले. यासंबंधीचे सर्व कामे तात्काळ करण्याचे आदेश सफाई विभागाच्या ठेकेदाराला देण्यात आले आहेत. त्याचबरोबर उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांना समज देण्यात आली. गुड मॉर्निंग पथकाकडूनही प्रबोधनस्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सिन्नर पालिकेकडून गुड मॉर्निंग पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्याधिकारी दूर्वास यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख, कर्मचारी अनिल जाधव, राकेश शिंदे, रूपेन शिंदे, जावेद शेख, दीपेश वैद्य, ताहीर शेख, भानुदास घोरपडे, सतीश शिंदे, प्रवीण भोळे, दीपक भाटजिरे, शशिकांत भोळे, दीपक जाधव, सचिन हेंगळे, योगेश जाधव, दीपक पगारे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गुड मॉर्निंग पथकात सहभागी झाले आहेत. या पथकातील कर्मचाऱ्यांनी सूर्यतळे व स्मशानभूमी परिसरात जाऊन उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांना समज देण्यासह त्यांचे प्रबोधन केले. यापुढे दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती केली जाईल. त्यांच्या साफसफाईकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. आठवड्यातून एकदा फिरून त्यांची पाहणी केली जाईल. वैयक्तिक शौचालयांकडे दोन्ही पातळीवर गांभीर्याने लक्ष दिले जाणार आहे. - व्यंकटेश दूर्वास, मुख्याधिकारी
खुळखुळ्या.. ये रताळ्या आरं ऊठ की !
By admin | Published: September 30, 2016 11:12 PM