नाशिक, दि. 3 - जालना येथून मुंबईला जाणाऱ्या लक्झरी बसवरील चालकाचा झाड वाचविण्याच्या प्रयत्नात बसवरील ताबा सुटल्याने बस अपघातग्रस्त झाली.मात्र प्रसंगावधान राखून चालकाने बसवर नियंत्रण मिळविल्याने अपघाताची मोठी दुर्घटना टळली.घोटी जवळील देवळे पूल कमकुवत झाल्याने अवजड वाहनाची वाहतूक देवळे खैरगाव शेणवड मार्गे वळविण्यात आली आहे.मात्र अवजड वाहनांमुळे हा पर्यायी रस्ताही नष्ट झाल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून या रस्त्यावर वाहन चालवावे लागत आहे.आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास जालना येथून 35 प्रवासी घेऊन मुंबईला जाणारी सिद्धार्थ ट्रॅव्हल ची बस क्रमांक एम. एच.04,जी.पी.5592 ही शेणवड बु.येथील बंधाऱ्याखालून घोटी काळुस्ते रस्त्याकडे येत असताना,रस्त्यालगत असणाऱ्या झाडाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटला.व संपूर्ण बस रस्त्यालगतच्या खोल भागाकडे गेली.मात्र यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण मिळविल्याने बस रस्त्यालगत अडकली.दरम्यान सर्व प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी सुरक्षितरीत्या बाहेर काढले.
पर्यायी रस्ता झाला बंद दरम्यान या बसच्या अपघातामुळे बस रस्त्यातच अडकून पडल्याने शिर्डी,मुंबई,अकोले आदी ठिकाणी जाणार हा पर्यायी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.