नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली असून, तितकेच संशयित रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. मात्र अनेक संशयित खुलेआम बाहेर फिरत असल्यानेही रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आता गृह विलगीकरणात उपचार घेत असलेल्या रुग्णांवर उपचार होतात किंवा नाही, ते खरोखरच गृह विलगीकरणात आहेत की बाहेर फिरतात, याची रोज पाहणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. काही रुग्णांच्या घरी जाऊन, तर काहींशी फोनवर व्हिडिओ कॉल करून खातरजमा करण्याचे सुचविले आहे. त्याचाच भाग म्हणून स्वतः बनसोड यांनी काही निवडक संशयित रुग्णांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यावेळी येवला शहरातील एका रुग्णाशी बनसोड यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. महिला रुग्णाच्या पतीने फोन उचलून संवाद साधला. स्वतः मुख्य कार्यकारी विचारणा करतात यावर त्याचा अगोदर विश्वास बसला नाही; पण व्हिडिओ कॉल असल्याने त्याने मनमोकळेपणाने पत्नीच्या तब्येतीची माहिती दिली. सात दिवसांपासून घरातील एका खोलीत तिची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले; तसेच तिच्या आहाराबाबत माहिती दिली. दोन वेळेस आरोग्य कर्मचारी घरी येऊन विचारपूस करून गेल्याचे सांगितले. आता सात दिवस झाले, पुढे काय करायचे मार्गदर्शन करा म्हणून त्याने आर्जव केले. कोरोना विषयक जनतेत झालेली जागृती व स्वतः हुन घेतली जात असलेली काळजी पाहून बनसोड यांनी समाधान व्यक्त केले, पण त्याच बरोबर एका खेड्यातील व मोबाईल फोन नसलेल्या संशयित रुग्णांशी संपर्क साधण्याचा विचार करून सदर गावाच्या ग्रामसेवकाला रुग्णाच्या शेतात पाठवून व्हिडिओ कॉल करायला सांगितले. झोपडीत राहून गुजराण करणाऱ्या व काहीशा अशिक्षित असलेल्या या संशयित रुग्णाला लक्षणे जाणवू लागताच, त्याने आपल्या कुटुंबाला शेतातील घरी पाठवून दिले व स्वतः एकटा राहून उपचार घेत असल्याची माहिती बनसोड यांना त्याने दिली.
जिल्हा परिषदेकडे जिल्ह्यातील कोरोनाबाधित व विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संपूर्ण माहिती संकलित केली जात आहे; त्यामुळे कोणत्याही रुग्णांशी कधीही संपर्क साधता येतो.
(फोटो ३० लीना)