नाशिक : श्री गणेश जयंतीनिमित्ताने शहरातील गणेश मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी भाविकांची दिवसभर गर्दी झाली होती. अनेकठिकाणी पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्री गणेश जयंती अर्थात माघी गणेशोत्सवानिमित्त शहरातील गणेश मंदिरांमध्ये मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. रविवार कारंजा येथील सिद्धीविनायक मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी सुकामेवा आणि फळे-फुलांची सजावट लक्षणीय ठरली. आनंदवली येथील नवश्या गणपती येथे सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांग लावली होती. नाशिकरोड येथील विहितगाव नवग्रह श्री सिद्धपीठम अण्णा गणपती मंदिर येथे महायागचे आयोजन करण्यात आले होते. खासदार हेमंत गोडसे, आमदार बबनराव घोलप, सुनील बागुल यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. उपनगर येथील इच्छामणी गणपती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती. व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती. जेलरोड येथील एम.एस.ई.बी. कॉलनी येथील गणपती मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. अशोकस्तंभावरील ढोल्या गणपती, भद्रकालीतील साक्षी गणेश मंदिर, सिडकोतील पवननगर येथील सिद्धीविनायक मंदिर येथेही विविध धार्मिक कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. देवळालीगाव येथील गणेश मंदिरात गणेशयाग, महापूजा, महाआरती आदी कार्यक्रम झाले. सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
शहर परिसरात माघी गणेशोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:32 AM