ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांच्या संकल्पनेतून वास्तुविशारद जितेंद्र जगताप यांनी नव्या आकर्षक छताची डिझाईन तयार केली आहे. त्यासाठी मूर्तीच्या चारही बाजूंनी २१ फुटांचे कॉलम उभारले जाणार आहे. आकर्षक नक्षीदार खांब, त्यावर सॅन्ड स्टोन टेक्सचर केले जाणार असून मूर्तीच्या मागच्या बाजूला असणाऱ्या मातीच्या भिंतीची पडदी भरून मजबुतीकरण करण्यात येणार आहे. १९४७ मध्ये मूर्तिकार रंगनाथ लोखंडे यांनी स्टीलचे रॉड आणि सिमेंटचा वापर करून १५ फूट उंचीची लंबोदराची महाकाय मूर्ती साकारली. त्यावेळी भैरवनाथ महाराजांचे मंदिर अतिशय लहान होते. या मंदिरासमोर चिंचेच्या झाडाखाली महाकाय गणेशमूर्ती तयार करण्यात आली. मूर्ती बनवण्यास त्याकाळी जवळपास १ हजार ३५० रूपये खर्च आला. त्यानंतर १९७२-७३ मध्ये या मूर्तीचे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण व्हावे, या उद्देशाने सिमेंटचा स्लॅब टाकून छत तयार करण्यात आले. मात्र, काळाच्या ओघात हे छत जीर्ण होत गेले. जुने छत काढून त्याजागी नव्याने छत बांधण्याची संकल्पना पुढे आली. या आरसीसी कामासाठी १५ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याने जीर्णोद्धार समितीच्या माध्यमातून देणगीरांचय मदतीेने छत उभारणीसाठी कामाला वेग आला आहे. लोकवर्गणीतून याकामाला सिन्नरकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन जीर्णोद्धार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. चौकट- प्रसिद्ध सिनेकलावंत आणि दिग्दर्शक स्व. व्ही. शांताराम यांनी आपल्या राजकमल स्टुडिओमध्ये सिन्नरच्या या प्रसिद्ध महाकाय गणेशमूर्तीची प्रतिकृती स्व. रंगनाथ बाबा लोखंडे यांच्या हस्ते बनवून स्थापना केलेली आहे. सन १९६८ च्या सुमारास एअर इंडियाने त्या वर्षीच्या त्यांच्या कॅलेंडरवर सिन्नरच्या महाकाय गणेशाचे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. त्यामुळे सिन्नर शहराला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली.
सिन्नरच्या महागणपतीचे नक्षीदार छतामुळे आकर्षण वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 5:33 PM