नाशिक (सुयोग जोशी) : सियावर रामचंद्र की जय, पवनसूत हनुमान की जय, ‘जय श्रीराम, जय जय श्रीराम’ च्या जयजयकारात अन पुरोहितांच्या मंत्रोच्चारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुलगा अमित ठाकरे व स्नुषा मिताली ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी येथील प्रसिद्ध श्री काळारामाची महाआरती करण्यात आली. मंदिरात ठाकरे कुटुंबियांच्यावतीने गणपती पूजन, पुण्याहवाचन, अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणण्यात आली. त्यानंतर अमित व मिताली ठाकरे यांनी मंदिराला प्रदक्षिणा मारली.
यावेळी मंगेश पुजारी, श्रीकांत पुजारी, नरेश पुजारी यांनी पौरोहित्य केले. विश्वस्तांच्या हस्ते राज ठाकरे यांचा मंदिराची प्रतिमा व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिराभोवती पोलिसांची कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिराच्या आतमध्ये तसेच पटांगणात ठराविक नागरिकांनाच प्रवेश देण्यात आला होता. प्रारंभी मंदिराच्या प्रवेशद्वारावर राज ठाकरे यांचे ढाेल पथकाच्या निनादात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर पुष्पांची उधळण करण्यात आली. त्यानंतर महिलांनीही ‘राम आयेंगे तो दिवाली मै मनाऊंगी’ सारखी रामाची गीते गात परिसर राममय केला होता. भजनी मंडळानेही रामाची भजने गायली. मंदिर पटांगणात राज ठाकरे यांनी नाशिक भिखू संघ, प्रजापिता ब्रह्मकुमारर्व्इश्वरीय विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी, भजनी मंडळ तसेच चित्रकला महाविद्यालयाच्या मुलांची भेट घेत चौकशी केली.महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री
श्री काळारा मंदिराच्या प्रवेशद्वारावर राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी वेगवेगळ फलक लावण्यात आले होते. त्यातील मुख्य प्रवेशदवारावरील ‘महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ हा फलक लक्ष वेधून घेत होता. मंदिर परिसरात याच फलकाची जोरदार चर्चा रंगली होती.वर्धापनदिनी सभा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार, दि. ९ रोजी येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी ९ वाजेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटीही राज ठाकरे घेणार आहेत. यावेळी दुपारी ११ वाजेच्यादरम्यान राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्याच्या विविध भागातून पदाधिकारी, कार्यकर्ते शहरात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.