सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या सोनांबेत सीसीटी चर खोदण्याचे काम सुरू आहे. महिलांनी सकाळी ७ वाजेपासून श्रमदानाला सुरूवात केली. पानी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी व सर्व गावे पाणीदार करण्यासाठी या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभर जलचळवळ राबविली जात आहेत. पावसाचे पाणी जमिनीत योग्य पद्धतीने रूजविल्यास अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. आपण धरणी मातेचे रक्षण करणेकामी तसेच तालुक्यात यंदा पाऊस कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे, त्यामुळे या महाश्रमदान कार्यात आपण सहभाग होण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन उन्नती शहर स्तरीय संघ, सावित्रीबाई, भैरवनाथ, खडकपुरा, प्रेरणा, सहेली दामिनी वस्ती स्तरीय संघ व बचत गटातील एकूण ६५ व सोनांबे गावातील ३० महिला सदस्यांनी श्रमदान केले. ‘एकच क्रांती जल क्रांती, काय पाहिजे पाणी पाहिजे’ कोण देणार मी देणार, अन्न गुडगुडे-ङ्क्त नाल गुडगुडे आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव व अर्जुन भोळे यांच्या नेतृत्वाखाली व स्वसहभागातून हे श्रमदान कार्य करण्यात आले. यावेळी पानी फाउंडेशनचे प्रतिनिधी सागर पवार, अरविंद परदेशी, शाम पवार, पप्पू बोडके, नवनाथ बोडके, नितीन पवार, दशरथ पवार यांनी महिलांच्या श्रमदानाचे स्वागत केले. चंदू बोडके यांनी महिलांच्या नाश्त्याची व समाधान बोडके यांनी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिलीे होती.
बचत गटातील जलरागिणीद्वारे महाश्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 5:25 PM