नाशिक : सूर्य, चंद्र आणि गुरू हे सिंह राशीत आणि त्याच काळात अमावस्या असा दुर्मिळ योग यंदा शनिवार, दि. १२ सप्टेंबरपासूनच सुरू होत आहे. त्यामुळे भाविकांसह नाशिककर नागरिकांनी शनिवारी, दि. १२ रोजी सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांपासूनच महापर्वस्नानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक येथील पुरोहित संघासह महाराष्ट्रातील ज्योतिषाचार्य, धर्मशास्त्राचे अभ्यासक आणि वैदिक विद्वानांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. दरम्यान, गोदावरी दक्षिणवाहिनी होते तो रामकुंड ते मोदकेश्वर मंदिरापर्यंतचा भाग रामतीर्थ घाट म्हणून ओळखला जात असल्याने या परिसरात स्नान करण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.महापर्वाचे शाहीस्नान साधू-महंत दि. १३ सप्टेंबरला सकाळी करतील. पहिल्या पर्वणीला कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली प्रशासनाने उपासना स्वातंत्र्यावरच गदा आणली होती. अनेकांना रामतीर्थावर पोहोचता आले नव्हते. हीच स्थिती त्र्यंबकेश्वरबाबतीतही होती. पहिल्या पर्वणीसारखी वेळ महापर्वाच्या दिवशी येऊ नये यासाठी विद्वानांनी हा शास्त्र निर्णय दिला आहे. या निर्णयाला दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते, ज्योतिषाचार्य अरविंद पंचाक्षरी, पंचांगचे अभ्यासक गौरव देशपांडे, धर्मशास्त्राचे अभ्यासक शांतारामशास्त्री भानोसे, सनातन वैदिक धर्मसभेचे अध्यक्ष पंडित भालचंद्रशास्त्री शौचे, माधवदास राठी, पंडित मकरंद गर्गे आदिंनी संमती दिली आहे. २४ जानेवारी २००१ रोजी पवित्र मौनी अमावस्या होती. मात्र ही अमावस्या दि. २३ रोजी दुपारी ३.५३ ला सुरू झाली. प्रयागचा दुसरा कुंभमेळा २०१३ मध्ये झाला. त्यातील मुख्य स्नान १० फेबु्रवारीला होते. मात्र अमावस्या दि. ९ रोजी दुपारी ३.२१ ते दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१५ पर्यंत होती. त्यावेळीही भाविकांनी अहोरात्र स्नान केले होते. येणाऱ्या भाविकांनीही संपूर्ण अमावस्येचा पर्वकाळ साधावा, असे आवाहन विद्वानांनी केले आहे.
उद्यापासूनच साधा गोदास्नानाची महापर्वणी
By admin | Published: September 11, 2015 12:50 AM