पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथे महिनाभर चालणाऱ्या भगवान महादेवाच्या काठी -कावडी उत्सवास गुढीपाडव्याच्या रात्रीपासून मोठ्या थाटात प्रारंभ झाला. गूळ, खोबरे, हरभऱ्याची भिजलेली डाळ असा प्रसाद वाटप करून शिवभक्तांकडून गावात काठी -कावडी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील घरा -घराघरातून महिलांकडून पूजा करून खोब-याच्या वाटीच्या माळा काठीला बांधण्यात आल्या .गुढीपाडव्यानंतर चैत्र महिन्याच्या प्रत्येक सोमवारी हि काठी संपूर्ण गावातून मिरवली जाते. त्यावेळी प्रत्येक घरासमोर भव्य काठी पूजेसाठी उभी केली जाते. संपूर्ण गावभर घराघरासमोर महिलांकडून गल्लीत सडा -रांगोळ्या घातल्या जातात. काठीला घरासमोर पूजेसाठी आल्यावर पाट टाकले जाते. लाकडी पाटावर महादेवाच्या काठीवर पाणी टाकून काठीवरील नंदीची घरोघरातील महिलांकडून आंघोळ घातली जाते. त्यावेळी प्रत्येक सुवासिनी व कुटुंब प्रमुखाकडून पूजा घातल्यानंतर काठी कावडी धारका जवळ भिजून ठेवलेली हरब-याची डाळ , गुळ, प्रसाद म्हणून दिले जाते . ज्या घरासमोर पूजा झाली, की तेथील व्यक्ती कडून काठीला खांदा लावून पाच पावले काठी पुढे नेली जाते तर काही ग्रामस्थांकडून या काठीला नवसही बोलले जातात. ज्या ग्रामस्थांची नवसपूर्ती होते. त्यांच्याकडून काठीच्या शेंड्याला खोब-याच्या वाटींची माळ घातली जाते. गावात दर सोमवारी मोठ्या उत्सवाचे वातावरण पहावयास मिळते. दरम्यान, गुढीपाडव्याच्या दिवशी काठी मिरवणुकीचा पहिला दिवस असल्याने ग्रामस्थांनी व शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती .
महादेवाच्या काठी-कावडी उत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 3:58 PM
पिळकोस: महिनाभर चालणार उत्सव
ठळक मुद्दे गावात दर सोमवारी मोठ्या उत्सवाचे वातावरण पहावयास मिळते.