सटाणा (जि. नाशिक) : भगवान ऋषभदेवांचा गुरुवारी (दि. १६) गर्भकल्याणक दिन असल्याने डॉ. पन्नालाल पापडीवाल परिवारातर्फे जयजयकारात, उत्साहात १०८ फूट उंचीच्या मूर्तीवर महामस्तकाभिषेक करण्यात आला. सकाळी सात वाजता डॉ. पन्नालाल पापडीवाल, त्यांचे पुत्र व मूर्तिनिर्माण समितीचे महामंत्री संजय व विजय आणि परिवारातील चार पिढ्यांचे सदस्य उपस्थित होते. प्रारंभी संकल्प, प्रार्थना यांचे पौरोहित्य विजय पंडित यांनी केले. रजत कलशाने पापडीवाल परिवाराचा सन्मान करण्यात आला.
महामस्तकाभिषेक सोहळ्याचा दुसरा दिवस होता. सहभागी भाविक मोठ्या संख्येने पहाटेपासून पोहोचले. पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामींनी अर्घ्य समर्पण केले. गणिनीप्रमुख ज्ञानमती माता व प्रज्ञाश्रमणी आर्यिका चंदनामती माता यांचे स्मरण करून श्रीफळ अर्पण करण्यात आले. स्वामीजींनी आशीर्वाद दिले. संजय पापडीवाल यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले.
या वेळी वयोवृद्ध मुनी सिद्धान्तकीर्ती तसेच कार्याध्यक्ष अनिलकुमार जैन, अधिष्ठाता सी. आर. पाटील, कोषाध्यक्ष प्रमोद कासलीवाल, भूषण कासलीवाल तसेच चंद्रशेखर कासलीवाल, आदी व्यासपीठावर होते. डॉ. जीवनप्रकाश जैन यांनी स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. हस्तिनापूर येथून ऑनलाईन सहभागी झालेल्या आर्यिका ज्ञानमती माताजींनी विश्वशांती प्रार्थना करून आशीर्वाद दिले. पूजाविधीनंतर पापडीवाल परिवाराने भक्तिनृत्य करून आनंद व्यक्त केला. सजविलेल्या पंचामृत कलशांमध्ये शेकडो लीटर नारळपाणी, उसाचा रस, तूप, दूध, दही, सर्वौषधी तसेच हरिद्रा, लालचंदन, श्वेतचंदन, चतुष्कोण कलश, केशर, सुगंधी फुले यांचा समावेश करण्यात आला. डॉ. प्रकाश, श्रीपाल, पवन पापडीवाल, ऊर्मिला व प्रमोद ठोले (औरंगाबाद), जयकुमार कासलीवाल (मालेगाव), अजित काला (गेवराई), राजकुमार चौधरी (टोंक - राजस्थान), मीना व बबनलाल गोधा (पैठण), सीमा व कैलास काला (नांदगाव) संगीता व जितेंद्र छाबडा (वाशीम) उपस्थित होते. या वेळी जिनेश पापडीवाल यांचा स्वामींजीनी सत्कार केला. अंजली पापडीवाल यांनी गर्भकल्याणक दिनानिमित्त रत्नांची वृष्टी केली. जयपूर येथून आलेले गायक संतोष यांनी सुमधुर भजनांनी वातावरणात पावित्र्य निर्माण केले. संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.