नाशिक : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या गांधी जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील प्लॅस्टिक कचरा एकाच वेळी गोळा करण्यासाठी २ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये महाश्रमदान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महाश्रमदान कार्यक्रम व स्वच्छता शपथ कार्यक्रमांत सर्व जिल्हावासीयांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून ११ सप्टेंबर ते २७ आॅक्टोबर दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत दिनांक ११ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर कालावधीत पूर्वतयारी आणि जनजागृती, २ आॅक्टोबर २०१९ रोजी देशभर शपथ आणि श्रमदान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, महाश्रमदानातून गोळा होणाऱ्या प्लॅस्टिक कचºयाचे संकलन व व्यवस्थापन ३ ते २७ आॅक्टोबर या कालावधीत करण्यात येणार आहे. या संपूर्ण अभियान कालावधीत प्लॅस्टिक कचरा या विषयावर जनजागृती घडवुन प्लॅस्टिक गोळा करण्याचे तत्त्व जोपासले जावे, हा या अभियानाचा उद्देश आहे.२ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एकाच वेळी प्लॅस्टिक कचरा गोळा करण्याकरिता महाश्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १.५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीचे प्लॅस्टिक उदा. कॅरिबॅग्ज व पातळ पिशव्या २.५० मायक्रोनपेक्षा जास्त जाडीच्या पिशव्या उदा. दुधाच्या पिशव्या, अपारदर्शक प्लॅस्टिक, वेफर पॅकेट, फ्रुटी, कुरकुरे यांची आवरणे, प्लॅस्टिक बॉटल, शीतपेये, पाणी बॉटल्स, धोकादायक प्लॅस्टिक, तेलाच्या पिशव्या, कॅन, औषधाच्या बाटल्या, कीटकनाशकांच्या बाटल्या व पिशव्या यांचे वर्गीकरण करून गोळा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांत जमा झालेल्या प्लॅस्टिक कच-याची कार्यक्षम विल्हेवाट करण्यात येणार आहे. यासाठी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, प्रत्येक गावासाठी संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत.