नाशिक : राज्यात सर्वाधिक मतदारसंघ असलेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिकचा समावेश असल्याने यंदाच्या विधानसभेसाठी नाशिक जिल्ह्यात सर्वच पक्षांचे दिग्गज नेते नाशिकला येऊन गेले. त्यात राष्ट्रीय नेतृत्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांचा समावेश होता.
देशाचे सर्वोच्च पद असलेले विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टीने यंदाच्या वर्षभरात तिसऱ्यांदा नाशिकला आले होते. नाशिकच्या उमेदवारांसाठीच्या त्यांच्या सभेनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डूर, राज्यातील सर्वोच्च नेते असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेदेखील येऊन गेले.
भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, केंद्रीय राज्यमंत्री सत्यपालसिंग, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू, आमदार पंकजा मुंडे, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी नाशिक दौरा करून उमेदवारांचा प्रचार केला.
काँग्रेसकडून राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार नासिर हुसेन, प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत, आमदार सत्यजीत तांबे यांनी नाशिक जिल्ह्यात येऊन प्रचारसभांना हजेरी लावली. अर्थात या सर्व नेत्यांच्या सभा, रॅलींचा समाजमनावर काही प्रभाव पडला का, त्याचे चित्र निवडणूक निकालातूनच स्पष्ट होऊ शकणार आहे.
मुख्यमंत्र्यांसह सर्व पक्षांचे संस्थापक लावून गेले हजेरी
शिंदेसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा ज्योती वाघमारे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोहे, पालकमंत्री दादा भुसे यांच्या सभा झाल्या, तर उद्घ वसेनेकडून उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या सभा पार पडल्या.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभा झाल्या. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून अजित पवार यांच्या सभा झाल्या. त्याशिवाय मनसेचे संस्थापक राज ठाकरे, रिपाइंचे पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकर, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव या नेत्यांच्या सभा पार पडल्या.