Maharashtra Assembly Election 2024 : नाशिक : विधानसभा निवडणुकीत पक्ष आणि महायुतीच्या उमेदवारांचे काम न करता पक्षविरोधी काम केल्यामुळे नाशिक शहरातील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून अन्य पक्षात जाऊन उमेदवारी मिळविलेल्या गणेश गीते आणि दिनकर पाटील यांच्यासह शहरातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे.
नाशिक शहरात पक्षाचे काम करताना ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले अशा सर्वांचा अहवाल प्रदेश भाजपकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार भाजप प्रदेश नेतृत्वाने अशा लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना पक्षामधून काढल्याचे भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी सोमवारी (दि.१८) सांगितले.
त्यात माजी नगरसेवक कमलेश बोडके, गणेश गीते, दिनकर पाटील, रवींद्र धिवरे, मधुकर हिंगमिरे, माजी नगरसेविका इंदुमती नागरे, पल्लवी पाटील, भाजप नाशिक महानगर जिल्हा उपाध्यक्ष नीलेश भंदुरे, सातपूर मंडल सरचिटणीस रूपेश पाटील, प्रदेश कामगार आघाडी सरचिटणीस विक्रम नागरे, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष सार्थक नागरे, पंचवटी मंडल महिला अध्यक्ष अनिता सोनवणे, प्रभाग क्रमांक १ युवा मोर्चा अध्यक्ष आदित्य पवार, किसान मोर्चा चिटणीस हेमंत आगळे, युवा मोर्चा नाशिक महानगर जिल्हा उपाध्यक्ष गणेश काकड, युवा मोर्चा नाशिक महानगर सरचिटणीस अमोल दिनकर पाटील यांचा समावेश असल्याचेही शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी कळविले आहे.