नाशिक - विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर करताच यादीत नावं न आलेल्या आणि तिकीट न मिळालेल्या काही इच्छुकांकडून नाराजी, धुसफूस आणि काही मतदारसंघांमध्ये बंडखोरीची चिन्हे दिसू लागली आहेत. तर काहींनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठला असला तरी आता जाहीर झालेल्या नावांमध्ये बदल होण्याची शक्यता फारच धूसर आहे.
भाजपाने जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार यादीमुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही नेते उमेदवारीपासून वंचित राहिल्याने नाराज, तर काहींनी बंडखोरीचा इशारा दिल्याने काही मतदारसंघात बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपने पहिल्या यादीत जाहीर केलेल्या ९९ जागांमध्ये ४ जागा जिल्ह्यातील होत्या. नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम या दोन जागा नाशिक शहरातील तर चांदवड देवळा, बागलाण या दोन जागा ग्रामीण भागातील आहेत. पूर्वमधून इच्छुक असलेल्या गणेश गिते यांच्याकडून पक्षबदलाचा पवित्रा घेण्यात आला आहे.
नाशिक पश्चिममध्ये तर बंडखोरीचे जणू पेवच फुटले आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपच्या ११ इच्छुकांपैकी किती जण बंडाचा झेंडा हाती घेतात, त्याचीच चर्चा सुरू झाली आहे. काहींना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा आहे. त्यात नाशिक मध्यच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांचा समावेश आहे. त्यांनी थेट मुंबईला धाव घेतल्याची चर्चा आहे.
चांदवड-देवळ्यात उमेदवारी केदा आहेर यांना द्यावी, असे सांगून स्पर्धेतून नाव मागे घेतलेल्या आमदार डॉ. राहुल आहेर यांचेच नाव यादीत आल्याने आता केदा आहेर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. बागलाणमधून दिलीप बोरसे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाल्याने काही इच्छुकही नाराज असून ते काय पवित्रा घेतात, त्यावर भाजपाच्या जागांचे भवितव्य निश्चित होणार आहे.
फायदा की तोटा?
राज्यातील इच्छुक पक्ष आणि आघाड्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वप्रथम यादी जाहीर करून एकप्रकारे ९९ मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. मात्र, या सर्वप्रथम यादी जाहीर करण्याचा भाजपासह महायुतीला फायदा होतो की, तोटा ते निकालानंतरच समजेल.