नाशिक जिल्ह्यातील तब्बल तीन मतदारसंघांत एबी फॉर्मसह झालेली बंडखोरी आणि महायुतीतील इच्छुकांनी दंड थोपटत केलेले बंड शमविण्यासाठी भाजपला अखेर संकटमोचकाला मैदानात उतरवावे लागले असून, माघारीच्या मुदतीपर्यंत बंडखोरांची माघार व्हावी यासाठी नाशिकमध्ये दाखल झालेल्या गिरीश महाजन यांनी दिवसभरात अनेक नाराजांची भेट घेतल्याचे समजते.
पश्चिम मतदारसंघात आंदोलनात उतरून मध्य नाशिक मतदारसंघातून लढण्यासाठी बाह्या सरसावलेल्या लक्ष्मण सावजी यांनी महाजन यांच्या कार्यक्रमाची व्यवस्था केल्याने त्यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा महाजन येण्याआधीच सुरू झाली होती; तर उद्धव निमसे यांनी महाजन यांची भेट घेत चर्चा केल्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यात या आल्याचे चित्र दिसत होते.
सातपूर येथील बंडखोर शशिकांत जाधव यांच्याशीही महाजन यांनी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सिडकोतील मुकेश शहाणे आणि मध्य मतदारसंघातील आणखी एक इच्छुक सुरेश पाटील यांच्याशीही महाजन यांनी चर्चा केल्याचे सांगण्यात आले. या सर्वांबरोबर झालेल्या चर्चेत पक्षशिस्त महत्त्वाची असून, बंडखोरी सहन केली जाणार नाही, असा संदेश देतानाच तुमच्या मागण्यांचा भविष्यात विचार केला जाईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, नाशिकहून जळगावकडे रवाना होताना महाजन यांनी केदा आहेर यांची भेट घेतल्याचे समजते. त्यात त्यांची चर्चा झाली असून, येत्या दोन दिवसांत केदा आहेर माघार घेतील, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे
मनसे आणि समीर भुजबळ यांच्याबाबत सतर्कता
■ मुंबईत राज ठाकरे यांच्याशी भाजप श्रेष्ठींची चर्चा सुरू असून काही चर्चा अंतिम टप्यात आहेत. त्यानंतर नाशिकमधील दोन मतदारसंघांत मनसे माघार घेईल. मनसेच्या पश्चिम मतदारसंघासह इगतपुरीतील जागेबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. त्या सर्व जागांचा निर्णय दोन दिवसांत मुंबईत वरिष्ठांच्या बैठकीत घेतला जाईल.
■ समीर भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, याबाबतही सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे संकेत महाजन यांच्या दौऱ्यात मिळाले. भुजबळ यांनी माघार घेतल्यास दिंडोरी आणि देवळा- लीतील शिंदेसेनेच्या उमेदवारांनाही माघार घ्यावी लागेल, अशी परिस्थिती असल्याचे सूत्रांनी सांगितले.