सुनील गायकवाड
येवला - येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरळ लढत झाली. अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ, तर शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर' पाहावयास मिळाली. मतदारसंघात ऐनवेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलेला दौरा आणि मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार, याचे गणित येत्या २३ तारखेलाच सुटणार आहे.
मतदारसंघातील रस्ते, मांजरपाडा प्रकल्प, ३८ गाव पाणीपुरवठा योजना, प्रशासकीय इमारती याबरोबरच गावोगाव समाजमंदिरे, पर्यटनस्थळी बांधकामे आदींवर भर दिला. त्या जोरावर भुजबळ २००४, २००९, २०१४, २०१९ असे सलग चारवेळा निवडून आले. प्रत्येकवेळी भुजबळांचे मताधिक्य वाढतच गेले. मात्र, पहिल्या पाच वर्षांतच भुजबळ शिंदे यांच्यात दरी निर्माण झाली.
शिंदे यांनी २००९ ची निवडणूक भुजबळांच्या विरोधात लढवली. मात्र, त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. शिंदे पुन्हा आपली शस्त्रे म्यान करीत भुजबळांच्या तंबूत दाखल झाले. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शिंदे शरद पवार गटात दाखल होत, त्यांनी शरद पवारांची पहिलीच सभा येवल्यात घेतली. तेव्हाच त्यांनी भुजबळांच्या विरोधात उमेदवारी करण्याचा संकल्प केला होता. त्याला जोड मराठा आरक्षण आंदोलनाची मिळाली.
मंत्री भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या भूमिकेनंतर विकासकामे हे मुद्दे प्रचारात आणले. मतदारसंघातील हजारो कोटींची कामे त्यांनी मतदारांसमोर ठेवली व मतदानाचा आग्रह केला. विकासकामे व जरांगे फॅक्टरभोवतीच निवडणूक फिरली असल्याने शासनाच्या योजनांचा फारसा गवगवा झाला नाही. ज्येष्ठांच्या पर्यटनाचा मुद्दा तर क्वचितच वापरण्यात आला. तालुक्यातील नगरसुल, अंदरसुल, मुखेड, विंचूर, लासलगाव गटात भुजबळांना वातावरण अनुकूल होते.