"उद्योग गुजरातला; तेथून ड्रग्ज मात्र महाराष्ट्रात"; काँग्रेसच्या नासिर हुसेन यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 12:48 PM2024-11-12T12:48:40+5:302024-11-12T12:49:22+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ते बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बोलले. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काहीही बोलणे त्यांनी टाळले. 

Maharashtra Assembly Election 2024 Industry to Gujarat drugs are in Maharashtra says Congress Nasir Hussain | "उद्योग गुजरातला; तेथून ड्रग्ज मात्र महाराष्ट्रात"; काँग्रेसच्या नासिर हुसेन यांचा गंभीर आरोप

"उद्योग गुजरातला; तेथून ड्रग्ज मात्र महाराष्ट्रात"; काँग्रेसच्या नासिर हुसेन यांचा गंभीर आरोप

नाशिक : सत्ताधाऱ्यांविरोधात विधानसभा निवडणुकीतील लढाई फक्त काँग्रेस विरुद्ध 'भाजपा अशी नसून महाविकास आघाडीची सामूहिक लढाई आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले. त्या बदल्यात गुजरात येथून ड्रग्ज अन् गुटखा महाराष्ट्रात पाठविला जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य व खासदार नासिर हुसेन यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ते बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बोलले. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काहीही बोलणे त्यांनी टाळले. 

पत्रकार परिषदेस काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, शहराध्यक्ष आकाश छाजेड, महिला आघाडी प्रमुख स्वाती जाधव, राहुल दिवे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे छबू नागरे उपस्थित होते. नासिर हुसेन म्हणाले की, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यांत भाजपने तोडाफोडीचे राजकारण केले, मात्र आम्ही लोकांना जोडण्याचे काम करतोय. नाशिक जिल्ह्यात निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला फक्त तीन जागा आल्या असल्या तरी इतर ठिकाणी आमच्या पक्षाला समाधानकारक जागा दिल्याने ही एक राजकीय तडजोड असल्याचे हुसेन यांनी सांगितले. 

काँग्रेसने स्व. बाळासाहेब ठाकरे अन् सावरकर यांचे गुणगान गाऊन दाखवावे, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत दिले होते. आपण हे आव्हान स्वीकारले आहे का? असा प्रश्न खासदार हुसेन यांना विचारला असता बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे हेच आमच्यासोबत असल्याने आमचे एकमेकांविषयी प्रेम सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मात्र काही बोलणे त्यांनी टाळले.

अखेर घडले महाविकास आघाडीचे दर्शन 

मुंबईत रविवारी (दि.१०) महाविकास आघाडीतर्फे झालेल्या जाहीरनामा प्रकाशनाचा लाइव्ह सोहळा व नंतर पत्रकार परिषद होती. तेव्हा तेथे फक्त काँग्रेसचेच पदाधिकारी उपस्थित होते. 'जाहीरनामा आघाडीचा; उपस्थित पदाधिकारी मात्र काँग्रेसचेच या शीर्षकाखाली 'लोकमत'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे याची चर्चा रंगली. याचीच दखल म्हणून नासिर हुसेन यांच्या पत्रकार परिषदेला खबरदारी घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे छबू नागरे यांना हुसेन यांच्यासोबत व्यासपीठावर जागा देण्यात आली. तर उद्धवसेनेचे उमेदवार वसंत गीते स्वतः पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आले. त्यांनी पत्रकारांना हाय, हॅलो करत आम्हीदेखील आलो आहोत, याचे दर्शन घडविले. 
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Industry to Gujarat drugs are in Maharashtra says Congress Nasir Hussain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.