रेवन्नाथ जाधव
नाशिक : सिन्नर विधानसभा मतदारसंघात डझनभर उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार, विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उदय सांगळे यांच्यात दुरंगी होणार आहे. याशिवाय महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून शरद शिंदे, बसपाचे किशोर जाधव, रासपचे अशोक जाधव आदींसह अपक्ष उमेदवार हे या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत.
आमदार कोकाटे हे सहाव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे. कोकाटे यांनी १९९९, २००४ मध्ये शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवित विजय मिळवला होता. २०१४ मध्ये त्यांनी भाजपकडून निवडणूक लढविली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. २०१९ ची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवित विजय मिळवला होता. कोकाटे यांनी मंजूर करून पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी गोदाखोऱ्यात आणणारा नदीजोड प्रकल्प, बंदिस्त पूरचारी आदींसह विकासकामांच्या मुद्द्यांवर ते निवडणुकीला सामारे जात आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार उदय सांगळे हे पत्नी शीतल सांगळे या जिल्हा परिषद अध्यक्षा असताना त्यांनी केलेल्या विकासकामांच्या मुद्द्यांच्या आधारे निवडणूक लढवित आहेत.
निष्ठावंतांची नाराजी दूर
लोकसभा निवडणुकीत सांगळे तटस्थ राहिले होते. ते विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते, परंतु त्यांना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत कोंडाजी मामा आव्हाड, राजाराम मुरकुटे आदी नाराज झाले होते. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची नाराजी दूर केल्याने ते प्रचारात उतरले. या निवडणुकीत ओबीसी व मराठा फॅक्टर दिसून येत आहे.
हे आहेत प्रश्न
■ सिन्नर- नायगाव- सायखेडा रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनाचालकांना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप आहे. ■ पांगरी येथे अर्धवट भरीव उड्डाणपूल झालेला असून, येथे बांधण्यात आलेला बोगदा नवीन पांगरी मन्हळ रस्त्यावर बांधण्याऐवजी तो जुन्या पांगरी महळ रत्स्यावर बांधण्यात आल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे सदर पूल अर्धवट स्थितीत पडून आहे. ■ औष्णिक वीज प्रकल्प व सेझचा प्रश्न गेल्या १८ वर्षांपासून प्रलंबित आहे. ■शेतमालाला हमीभाव हवा, दुधाला योग्य दर मिळावा. ■थकीत वीजबिलांमुळे पाणीयोजनांचा खंडित होणारा वीजपुरवठा. ■ उद्योगांचे स्थलांतरामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जातीय गणिते ठरणार महत्त्वपूर्ण...
■ सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात मराठा समाज बहुसंख्येने आहे, तर नांदूरशिंगोटे, गुळवंच, नायगाव, दोडी, दापूर या भागात वंजारी समाजाचे प्राबल्य असल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही समाजाच्या खालोखाल माळी, धनगर, दलित व मुस्लीम समाजाची मतेही निर्णायक आहे. १९९९ च्या निवडणुकीत तुकाराम दिघोळे व माणिकराव कोकाटे यांच्यातील लढत ही जात फॅक्टरवर होऊन त्यात कोकाटे यांनी बाजी मारल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यंदा काय होते, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.
खासदार राजाभाऊ वाजे यांची निर्णायक भूमिका
■ गेल्या दोन ते तीन पंचवार्षिकपासून होणारी माणिकराव कोकाटे विरुद्ध राजाभाऊ वाजे ही पारंपरिक निवडणूक यंदा दिसत नाही, कारण वाजे हे लोकसभेवर निवडून गेले असल्यामुळे कोकाटे हे निर्धास्त असल्याचे बोलले जात आहे. परंतु, उदय सांगळे यांनी त्यांना चांगलेच आव्हान दिले असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीच्या वतीने खासदार राजाभाऊ वाजे हे उदय सांगळे यांच्या प्रचार सभांमधून दिसत असले, तरी त्यांचे कार्यकर्ते - पुरुष १,६८,४५९ - एकूण ३,२३,४६४ मात्र सांगळे यांच्याबरोबर नसल्याचे चित्र आहे. मात्र, खासदार वाजे यांची भूमिका मात्र या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार असून, ती येत्या २० नोव्हेंबरला समजणार आहे.