नाशिक : अनपेक्षितपणे उमेदवारी करणाऱ्या दिनकर पाटील यांच्यासाठी पायघड्या घालणाऱ्या मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकाच मतदारसंघात दोन सभा घेऊन डबल धमाका केला. त्यांनी राज्यातील विरोधकांवर घाव घातले खरे; मात्र, त्यांना लागलेला माजी महापौर अशोक मूर्तडकांचा घाव मात्र त्यांनी लपवून ठेवला आणि अनुल्लेखानेच मूर्तडक विषयाची बोळवण केली. दुसरीकडे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरणारे येथे सभा घेऊन आमदार सरोज आहिरे याच महायुतीच्या उमेदवार असल्याचे स्पष्ट करून त्यांचा भाव वाढवला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. जिल्ह्यात दोन ते तीन नेत्यांच्या किमान तीन ते चार ठिकाणी सभा होतात. शनिवारी (दि. १६) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा नाशिक पश्चिम मतदारसंघात दोन ठिकाणी झाली. अशा प्रकारे एकाच मतदारसंघात दोन सभा अपवादानेच घेतो याची कबुलीच राज ठाकरे यांनी दिली.
नाशिकचे मागासलेपण आणि महापालिकेत मनसेची कारकीर्द असताना केलेली कामे या संदर्भात त्यांनी ऊहापोह करताना स्थानिक कोणावर टीका केली नाही. मात्र अपेक्षेनुसार उद्धव ठाकरे आणि अन्य विरोधी पक्षांवर टीका केली. माजी महापौर अशोक मूर्तंडक हे शुक्रवारी (दि. १५) उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धव सेनेत दाखल झाले. मात्र, त्याची दखलही राज यांनी घेतली नाही.
राज ठाकरे यांनी विरोधकांवर घाव घातले असताना अजित पवार यांनी गिरणारे येथे घेतलेल्या सभेत मात्र, सरोज आहिरे याच महायुतीच्या उमेदवार आहेत, याचे स्पष्टीकरण दिल्याने मैत्रीपूर्ण लढत म्हणून शिंदेसेनेच्या चिन्हावर लढणाऱ्या राजश्री अहिरराव यांची अडचण केली. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट आदेश नाही म्हणून तटस्थ राहून नंतर अहिरराव यांचा प्रचार करणाऱ्या शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी खास पत्रच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आणले होते. त्याचे वाचन केल्याने आता शिंदेसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी आणि उपनेते विजय करंजकर यांना रविवारी (दि. १७) भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. शिंदेसेनेचे हेमंत गोडसे यांनी तर मैत्रीपूर्ण लढतीचा संदेह फिटला. आता आहिरे याच उमेदवार असल्याचे स्पष्ट केले आहे.