संजय पाठक, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: गेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीपाठोपाठ भाजपने वर्चस्व सिद्ध केले असले तरी फाटाफुटीनंतर होत असलेल्या यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात अजित पवार गटच मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांनी सात उमेदवार घोषित केले असून, नांदगाव आणि मालेगाव मध्य मतदारसंघासाठी दावेदारी आहे, ही दावेदारी मान्य झाल्यास नाशिक जिल्ह्यातील एकूण १५ पैकी ९ जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार असतील.
गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सहा, भाजपचे पाच आमदार आणि शिंदेसेनेचे दोन आमदार निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीत भाजप शिंदेसेनेने सुरुवातीला बऱ्याच जागांसाठी आग्रह धरला होता. मात्र, प्रत्यक्षात अधिक न ताणता विद्यमान आमदार असलेल्या जागाच कायम ठेवल्या. भाजपने नाशिक मध्यवगळता उमेदवार घोषित केले आहेत. शिंदेसेनेने पाच जागांचा आग्रह धरूनही त्यांच्याकडे दोनच जागा कायम राहतील अशी स्थिती आहे. अजित पवार गटाने आपल्याकडे असलेल्या सहा जागांच्या व्यतिरिक्त क्रॉस व्होटिंग प्रकरणात गाजलेले काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आणि इगतपुरी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. याशिवाय मालेगाव मध्यची जागादेखील याच गटाकडे गेली आहे तेथे, भाजप, शिंदे गटाकडे सक्षम उमेदवार नाही.
नांदगाव जागेबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि नांदगावचे शिदेसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या मतदारसंघावर अजित पवार गटाचे समीर भुजबळ यांनी दावा केल्याने आमदार सुहास कांदे अस्वस्थ झाले आहेत. समीर भुजबळ खरोखरच निवडणूक लढवतील, की कांदे यांना केवळ अस्वस्थ करतील याबाबत शंका आहे. अर्थात, या जागेबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही.