नाशिकमधीलदेवळाली मतदारसंघाची निवडणूक यंदा महायुतीतील घटक पक्षातील राजकारण व हेव्यादाव्यामुळे अंतर्गत डोकेदुखी प्रचारापूर्वी तापदायक आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच दरम्यान आता अहिरे यांच्या प्रचारास सुरुवात झाली आहे. याच दरम्यान त्या भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या.
"२० तारखेला ही जनता माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं आहे त्याला उत्तर देईल" असं म्हटलं आहे. "जनतेचं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही. या जनतेने माझ्याकडे काहीच नसताना मला पदरात घेतलं. त्यामुळे या मायबाप जनतेची मी मनापासून ऋणी आहे. तो विषय काढला की मी भावनिक होते. हे प्रेम मी आयुष्यभर टिकवणार आहे."
"पदं येतील जातील पण हे प्रेम आयुष्यभर टिकवणार आहे. आशीर्वादाला आम्ही मुकलो होतो आता आम्ही प्रचंड समाधानी आहोत" असं म्हणत असताना सरोज अहिरे यांचे डोळे पाणावले. "आमच्याकडून फक्त मेसेज जातोय आणि लोक मोठ्या संख्येने प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. काही लोक स्वतःच्या गाड्या आणि जेवणाचे डबे सोबत घेऊन प्रचाराला येत आहे."
"गाडी उघडली तर जेवणाचे डबे दिसतील. २०१९ साली जसा प्रचार झाला तसाच प्रचार यंदा जनतेकडून सुरू आहे. २० तारखेला ही जनता माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं आहे त्याला उत्तर देईल" असं सरोज अहिरे यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. सुनील कोथमिरे, संतोष साळवे, तनुजा घोलप, प्रकाश दोंदे, दिलीप मोरे, रामदास सदाफुले या सहा जणांनी अखेरच्या दिवशी माघार घेतली.
माघारी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज आहिरे, शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे योगेश घोलप, मनसेच्या मोहिनी जाधव, वंचितचे अविनाश शिंदे, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे विनोद गवळी, राजू मोरे, अमोल कांबळे, कृष्णा पगारे, रविकिरण घोलप, लक्ष्मी ताठे, भारती वाघ हे १२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या मुदतीनंतर उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले.