Sharad Pawar Slam Chhagan Bhujbal : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर महाराष्ट्रातील ही मोठी निवडणूक असल्याने शरद पवार यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. प्रचारसभांमधून शरद पवार हे राष्ट्रवादीतील सहकाऱ्यांनाही लक्ष करत आहेत. येवल्यात झालेल्या सभेत शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चुकीचे काम करताना मर्यादा असतात, त्या भुजबळांनी शिल्लक ठेवल्या नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
येवल्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदे यांची लढत छगन भुजबळ यांच्याशी होणार आहे. माणिकराव शिंदे यांच्यासाठी शरद पवार यांनी मंगळवारी सभा घेतली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना चांगलंच समाचार घेतला. मंत्रिपदावर बसल्यावर त्यांनी काहीतरी उद्योग केल्याचेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
"बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या हातामध्ये मुंबईचे महापौर पद दिलं. त्याच बाळासाहेब ठाकरेंशी त्यांनी संघर्ष करायचं ठरवलं. बाळासाहेबांची टिंगल केली. एक दिवशी त्यांनी नाईलाजाने दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. बाळासाहेबांची ज्या प्रकारे त्यांनी टिंगल केली होती त्याविषयी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष होता. त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे मला संरक्षण द्या. मला कुठेतरी लपवून ठेवा. आम्ही त्यांना संरक्षण दिलं. नागपूरला नेऊन त्यांची व्यवस्था केली. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना आम्ही तिकीट दिलं तिथे त्यांना यश मिळालं. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना संधी देऊन विधान परिषदेवर घेण्यात आलं आणि विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर विधानसभेला पुन्हा एकदा संधी दिली. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये त्यांना आम्ही मंत्रीपदावर बसवलं. मंत्रीपदावर बसल्यावर त्यांनी काहीतरी उद्योग केले आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना ते पद सोडावं लागलं," असं शरद पवार म्हणाले.
"त्यांना अटक झाली आणि ते तुरुंगात गेले. तुरुंगात गेल्यानंतर अशा स्थितीमध्ये त्यांना कोणी भेटायला तयार नव्हते. माझी मुलगी आणि माझे सहकारी त्यांना भेटून धीर देत होते. त्यांच्या अडचणीच्या काळात आमच्या लोकांनी त्यांना धीर दिला. त्यानंतर तुम्ही लोकांनी माझ्या शब्दाची किंमत ठेवली आणि त्यांना विधानसभेत निवडून पाठवलं. निवडून दिल्यानंतर त्यांच्याकडे मंत्री पदाची जबाबदारी दिली. दोन नंबरचा मंत्रीपद त्यांच्याकडे दिला पण दुर्दैवाने तिथेही काही चुका झाल्या. चौकशानंतर त्यांना मंत्रीपद सोडावा लागलं. ते सोडल्यानंतर जे काही झालं ते पुन्हा करणार नाही अशी खात्री त्यांनी आम्हा लोकांना दिली. त्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी विसरलो आणि त्यांना एक प्रकारचं संरक्षण देण्याची भूमिका घेतली," असेही शरद पवार म्हणाले.
"आत्तापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना सहकार्य केले आहे. नंतरच्या काळात आमच्या सहकारी आणि उद्धव ठाकरे यांनी नवीन सरकार बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्या सरकारमध्ये भुजबळांना काम करण्याची संधी दिली. पुन्हा एकदा आमच्या काही सहकाऱ्यांनी फसवणूक करायचं ठरवलं आणि पक्ष फोडला. ही सगळी स्थिती मला समजली आणि मी ठरवलं पक्ष फोडला असला तरी आपण पुन्हा एकदा लोकांना उभं करू. एक दिवशी सकाळी भुजबळ माझ्याकडे आले आणि म्हणाले की हे जे काही झालं फार वाईट झालं. काही लोकांनी पक्ष फोडला आता ते काही करत आहेत त्याची माहिती घेतली पाहिजे. त्यांची समजूत काढली पाहिजे. मी त्यांची समजूत काढायला जाऊ का? मी म्हटलं जायला हरकत नाही. सुधारणा होत असतील तर करा. छगन भुजबळ गेले ते परत आलेच नाहीत ते तिकडेच बसले आणि नंतर कळलं दुसऱ्या दिवशी त्यांनी शपथ घेतली. एखाद्या माणसाने चुकीचं काम फसवेगिरी किती करावी याला मर्यादा असतात त्या सगळ्या मध्ये आता भुजबळांनी शिल्लक ठेवलेल्या नाहीत," अशी टीका शरद पवारांनी केली.