Babanrao Gholap : विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवारयांच्या राष्ट्रवादीने विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार योगेश घोलप यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. या निर्णयानंतर आता शिंदे गटाला मोठा फटका बसला आहे. शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंनी ठाकरेंनी मुलाला तिकीट देऊन खूप मोठे उपकार केले म्हणत बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाला रामराम केला आहे.
माजी समाज कल्याण मंत्री बबन घोलप यांनी लोकसभेआधी एप्रिल महिन्यात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून मुलाला उमेदवारी मिळताच बबनराव घोलप यांनी शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना बबनराव घोलप यांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्याने हा निर्णय घेत असल्याचं सांगितलंय. त्यामुळे आता पुन्हा एकदा बबनराव घोलप हे ठाकरे गटाप प्रवेश करणार असल्याचे म्हटलं जात आहे.
मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका करत बबनराव घोलप यांनी ठाकरे गट सोडला होता. ठाकरेंची शिवसेना सोडत असताना अन्याय झाल्याची भावना घोलप यांनी व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी मुलाला उमेदवारी दिल्याने बबनराव घोलप यांनी शिंदे गटाचा राजीनामा दिलाय. समाजाच्या आणि मतदारसंघातील कामांबाबत शब्दही न पाळल्याने बबनराव घोलप यांनी पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली.
"मी सहा एप्रिल रोजी आपल्या पक्षात प्रवेश केला होता. त्यात माझ्या समाजाच्या काही मागण्या मागितल्या होत्या व मतदारसंघात काही कामे करण्याचे मान्य केले होते. पण यापैकी एकही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे समाज फार नाराज झाला आहे. आता माझ्या मुलाला शिवसेनेने तिकीट देऊन माझ्यावर फार मोठे उपकार केले आहेत. म्हणून मी आपल्या शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा राजीनामा देत आहे," असं बबनराव घोलप यांनी पत्रात म्हटलं आहे.