लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : पश्चिम विधानसभा निवडणुकीसाठी २२ उमेदवारांद्वारे ३८ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यांपैकी पक्षाच्या नावाने अर्ज दाखल केलेल्या मात्र अर्जासोबत एबी फॉर्म नसल्याने ते अर्ज बाद करण्यात आले, इतर सर्व अर्ज मंजूर करण्यात आले. त्यामुळे रिंगणात २२ उमेदवार शिल्लक राहिलेले आहेत. मतदानासाठी एका इव्हीएम मशिनवर १६ नावे देता येत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात दोन ईव्हीएम लागण्याची शक्यता आहे. पश्चिममधून हर्षा सुधाकर बडगुजर यांनी भरलेला डमी अर्ज मागे घेतला आहे.
मध्यमधून अपक्षाचा अर्ज बाद; पाटील, कोकणी आता अपक्ष
मध्य विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र छाननीअंती अपक्ष उमेदवार तोफिक अल्लाउद्दीन पठाण यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. काँग्रेसच्या बंडखोर डॉ. हेमलता पाटील व गुलजार कोकणी यांनी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडला नसल्याने त्यांचा अर्ज बाद केला गेल्याने त्या अपक्ष उमेदवार असतील. मतदारसंघात २१ उमेदवार रिंगणात असून, या ठिकाणी बंडखोरी जास्त असल्याने माघारीकडे लक्ष लागले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अर्पित चौहाण व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शोभा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविण्यात आली. मतदारसंघात २२ उमेदवारांनी एकूण ३१ अर्ज दाखल केले होते. आता २१ उमेदवार रिंगणात आहेत.
अर्ज बाद...
नाशिक मध्य : अपक्ष पठाण यांच्या अर्जात दहा सूचकांची स्वाक्षरी नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला; तर डॉ. पाटील व गुलजार कोकणी यांनी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याने या दोघांचे पक्षीय अर्ज बाद करत अपक्ष अर्ज वैध ठरविण्यात आले.