अजित पवार गटाचे सर्वाधिक उमेदवार; उमेदवारीच्या वाटाघाटीत किल्ला राखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2024 09:33 AM2024-10-28T09:33:05+5:302024-10-28T09:35:10+5:30

देवळालीत शरद पवार गटाकडून सर्वाधिक इच्छूक असूनही त्यांनी या जागेवरील दावा का मागे घेतला ? त्याचे कोडेच पदाधिकाऱ्यांना उलगडलेले नाही.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 ajit pawar group most candidates in nashik | अजित पवार गटाचे सर्वाधिक उमेदवार; उमेदवारीच्या वाटाघाटीत किल्ला राखला

अजित पवार गटाचे सर्वाधिक उमेदवार; उमेदवारीच्या वाटाघाटीत किल्ला राखला

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या अडकून पडलेल्या उमेदवारीलादेखील ग्रीन सिग्नल मिळाल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या विद्यमान ६ जागांपैकी सर्वच्या सर्व ६ जागांवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, इगतपुरीतील आमदार हिरामण खोसकरदेखील अजित पवार गटात आल्याने राष्ट्रवादीचा अजित पवार गट जिल्ह्यात सर्वाधिक ७ जागांवर लढणार आहे. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने देवळालीऐवजी नाशिक पूर्व मतदारसंघाचा बदल करतानाच कळवणचा मतदारसंघ माकपासाठी सोडला असला तरी सहाऐवजी ५ जागा प्रत्यक्ष तर एक जागा मित्र पक्ष माकपाला देऊन जिल्ह्यातील उमेदवारीचा किल्ला कायम राखला आहे.

महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील जागावाटप जवळपास पूर्ण झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जिल्ह्यातील जागावाटपात सर्वाधिक जागांवरील दावा कायम ठरला आहे. जिल्ह्यातील १५ पैकी येवला, दिंडोरी, सिन्नर, नाशिक पूर्व आणि बागलाण या ५ जागा शरद पवार गटाच्या वाट्याला आल्या अजून कळवणची जागाही त्यांच्याकडे आहे. परंतु, ती 'माकप'ला सोडण्यात आली आहे. निफाडमध्ये राष्ट्रवादीचा आमदार असला तरी, या ठिकाणी माजी आमदार अनिल कदम यांच्यासाठी उद्धवसेनेने ही जागा त्यांच्याकडे खेचून घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे सहा जागा या शरद पवार गटाला मिळणार असल्या तरी त्यातील एक जागा माकपला सोडल्याने शरद पवार गटाचे पाचच उमेदवार प्रत्यक्षात लढणार आहेत.

देवळालीत शरद पवार गटाकडून सर्वाधिक इच्छूक असूनही त्यांनी या जागेवरील दावा का मागे घेतला ? त्याचे कोडेच पदाधिकाऱ्यांना उलगडलेले नाही. अखेरच्या टप्प्यात उद्धवसेना आणि शरद पवार गटात जागांची अदलाबदल होऊन उद्धवसेनेने देवळाली तर शरद पवार गटाने नाशिक पूर्वची जागा पदरात पाडून घेतली. या जागांच्या अदलाबदलीमुळे जागावाटप रखडल्याचे चित्र होते. मात्र, आता त्या दोन्ही जागांवरील उमेदवारदेखील जाहीर करण्यात आल्याने मविआमधील शरद पवार गटाच्या जागांचे चित्र स्पष्ट झाले आहे.

इगतपुरीचा लाभ; मालेगाव मध्यवरही दावा

महायुतीच्या जागावाटपातही निफाडच्या जागेवर राष्ट्रवादीचे दिलीप बनकर हेच आमदार असल्याने आणि त्यांनी प्रारंभा- पासून अजित पवार गटात प्रवेश केलेला असल्याने उमेदवारी त्यांनाच मिळण्याची चर्चा होती. मात्र, भाजपकडून निफाडच्या जागेवर दावा करण्यात आल्याने या जागेवरील बनकर यांच्या नावाची घोषणा सर्वात शेवटच्या टप्प्यात झाली. अखेरीस येवला, दिंडोरी, सिन्नर, कळवण, देवळाली आणि निफाड या गतवेळच्या सहाही जागा अजित पवार गटाने कायम राखल्या आहेत. त्याचबरोबर पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे मात्र गत निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये गेलेले इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी पुन्हा अजित पवार गटात उडी मारल्याने अजित पवार गटाला ७ जागांचा लाभ झाला आहे. मालेगाव मध्यच्या जागेसाठीदेखील अजित पवार गटाचा दावा असून अद्याप तरी मालेगाव मध्यच्या जागेबाबत निर्णय झालेला नसला तरी ती जागादेखील अजित पवार गटालाच मिळाल्यास जिल्ह्यात निम्म्याहून अधिक तब्बल ८ जागा अजित पवार गटाकडून लढवल्या जाण्याची शक्यता आहे.

 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 ajit pawar group most candidates in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.