लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बुधवारी (दि. ३०) झालेल्या छाननी जिल्हाभरातून २५ प्रक्रियेत उमेदवार रिंगणाबाहेर गेले असून, ६० उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. यानंतर, ३३७ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. आता माघारीकडे लक्ष लागले असून, त्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. दि. ४ तारखेपर्यंत शासकीय सुट्टी वगळता माघारीची प्रक्रिया पार पडणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर छाननी करताना त्रुटी असलेल्या अर्जासह एबी फॉर्म नसलेले अर्ज बाद करण्यात आले. असे एकूण ६० अर्ज बाद झाले असून, ६४६ अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. यात एकाच उमेदवाराने दोन नावांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरले असल्याने माघारीपर्यंत हे अर्ज आणखी कमी होणार आहेत. त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूकीतील चुरस दिसून येणार आहे.
देवळालीत ६ उमेदवार बाद
देवळाली मतदारसंघातून सर्वाधिक ६ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत, तर मालेगाव बाह्य, चांदवड, बागलाण आणि नाशिक पश्चिम येथून एकही उमेदवार बाद झाला नाही. मात्र, याठिकाणी एकाच उमेदवाराने दाखल केलेले दुसरे अर्ज बाद झाले आहेत.
सर्वाधिक उमेदवार नांदगाव, मालेगाव बाह्यमध्ये
छाननीनंतर जिल्ह्यातील १५ मतदारसंघांपैकी सर्वाधिक उमेदवार नांदगाव आणि मालेगाव बाह्य (३२) या मतदारसंघांमध्ये असून, त्या खालोखाल येवला येथे ३० उमेदवार रिंगणात आहे. सर्वात कमी १५ उमेदवार कळवण आणि नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये असून, जर उमेदवारांची संख्या कमी झाली नाही, तर प्रत्येक ठिकाणी दोन यंत्रे लावावी लागणार आहेत. प्रशासनाचे कामकाज वाढण्यासह मतदान प्रक्रिया, मतमोजणी यासाठी जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे.