लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्याशरद पवार गटाचे पक्षाध्यक्ष शरद पवार मंगळवारी (दि. १२) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ६ मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेण्याचे त्यांचे नियोजन आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असलेल्या स्वपक्षाच्या उमेदवारांच्या मतदारसंघात ४ तर सहयोगी उद्धवसेना आणि माकपाच्या मतदारसंघात प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ६ सभांचे नियोजन करण्यात आले आहे. माकपचे उमेदवार जे. पी. गावितांच्या प्रचारासाठी १२ नोव्हेंबरला सकाळी १०:३० वाजता शरद पवार त्यांची पहिली सभा कळवणला घेणार आहेत. त्यानंतर दिंडोरीतील उमेदवार सुनीता चारोस्कर यांच्यासाठी दुपारी १२ वाजता सभा होईल. निफाडमधील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल कदम यांच्यासाठी दुपारी १ वाजता पिंपळगाव बसवंतला सभा घेतील.
येवल्यात माणिकराव शिंदे यांच्या प्रचारासाठी ३ वाजता सभा होईल. सिन्नरमधील उमेदवार उदय सांगळे यांच्यासाठी ५ वाजता सभा होणार आहे. तर नाशिक पूर्व मतदारसंघाचे उमेदवार गणेश गिते यांच्यासाठी ते सायंकाळी ७:३० वाजता आडगावला सभा घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी दिली. यासाठी जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांकडून नियोजन सुरू असून सभास्थळांची तयारी सुरू आहे.