लोकमत न्यूज नेटवर्क, नांदगाव : नांदगाव विधानसभा मतदारसंघातील, मालेगाव तालुक्यातील साकूर येथे अपक्ष उमेदवार व माजी खासदार समीर भुजबळ यांची सभा काही गावगुंडांनी उधळून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ग्रामस्थांनीच तोडीस तोड उत्तर दिल्याने गावगुंडांची पळता भुई थोडी झाली आणि गावगुंडांच्या नाकावर टिच्चून साकूरकरांनी सभा घेतली.
नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या साकूर येथे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांची सोमवारी (दि. ११) सायंकाळी सभा होती. या सभेला भुजबळ पोहोचले व सभा मंडपाच्या आवारात सभा सुरू असताना गावातील काही गावगुंडांनी तेथे येत हस्तक्षेप करीत सभा उधळण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकऱ्यांनी त्याला भीक घातली नाही. उलट, गावकऱ्यांनी समीर भुजबळ यांना सभा पूर्ण करण्याचा आग्रह धरला.
गावकऱ्यांच्या या एकजुटीमुळे गावगुंडांची मात्र पळताभुई थोडी झाली. यावेळी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ म्हणाले की, विद्यमान आमदार हे विकासाच्या मुद्द्यावर बोलतच नाहीत. उलट, विकासाच्या गोष्टी आम्ही करतो आणि या विकासकामांमध्ये गावगुंडांना आणून सभा उधळण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. अशा गुंडगिरी आणि दडपशाहीला कोणी भीक घालू नका.
आपल्याला नांदगाव विधानसभा मतदारसंघ भयमुक्त करायचा आहे. ही गुंडगिरी आपण सर्व मिळून सगळेच हद्दपार करू, असे भुजबळ यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
विरोधकांना आता पराभव दिसू लागला असून, ते असे प्रकार करीत आहेत. त्यामुळे अशा गावगुंडांच्या आणि आमदाराच्या दडपशाहीला कुणी घाबरू नये. भयमुक्त नांदगावसाठी मी कटिबद्ध आहे. नागरिकांनीही त्यासाठी साथ द्यावी. - समीर भुजबळ, अपक्ष उमेदवार