लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : नाशिकच्या विकासाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ब्रेक लागला होता. महायुती सत्तेत आल्यानंतर हा अडथळा दूर सारत कोट्यवधींचा निधी आम्ही अडीच वर्षांत दिला. नाशिकच्या पुण्यभूमीत लवकरच आयटी पार्क साकारले जाईल. आयटी पार्कसाठी अगोदर जी कनेक्टिव्हिटी लागते ती आम्ही रस्ते, बस, रेल्वे व विमानसेवेचे जाळे निर्माण करून उपलब्ध करून दिली, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील जाहीर सभेत सांगितले.
फडणवीस यांनी 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांची कथित क्लिप ऐकविली. स्वातंत्र्य सैनिक अनंत कान्हेरे मैदानावर रविवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.
व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महायुतीचे उमेदवार प्रा. देवयानी फरांदे, आमदार अॅड. राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज अहिरे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, अजित पवार गटाचे रंजन ठाकरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण, लक्ष्मण सावजी, गुजरात येथील आमदार अमित ठाकर आदी उपस्थित होते. उमेदवारांसह चव्हाण, लोंढे यांनी संवाद साधला.
नाशिक पश्चिममध्ये कोट्यवधींची कामे केली असून उबाठाचे प्रतिस्पर्धी उमेदवार गुंडगिरी करीत आहेत. महायुतीने मतदारांना न्याय दिला आहे. महिलांमध्ये लाडकी बहीण योजनेमुळे समाधान आहे. - सीमा हिरे, उमेदवार
नाशिकमध्ये कोविड काळात परिस्थिती भयावह होती. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून होते. त्यांनी तेव्हा नाशिकला भेट दिली नाही. पण देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी येथील कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. - राहुल ढिकले, उमेदवार