लोकमत न्यूज नेटवर्क, मालेगाव कॅम्प: विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य मतदारसंघात भाजपच्या उमेदवार सुरेखा पाटील यांनी पक्षाचा एबी फॉर्म न जोडल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यामुळे मतदारसंघात भाजपचा उमेदवार रिंगणात असणार नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपची उडालेली दाणादाण पाहता मुस्लिमबहुल असलेल्या या मतदारसंघात भाजपने उमेदवारच न देण्याचे ठरवले असल्याचे समोर आले असून, त्याला पक्षाच्या मालेगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी देखील दुजोरा दिला आहे.
मालेगाव मध्य मतदारसंघात अर्ज छाननीनंतर १६ उमेदवार रिंगणात उरले आहेत. अर्ज माघारीनंतर मतदारसंघातील अंतिम चित्र स्पष्ट होईल. हा मतदारसंघ जागावाटपात महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आहे. भाजपचा उमेदवार गेल्या सहा पंचवार्षिकपासून येथे लढत देत आला आहे; परंतु मुस्लिमबहुल असलेल्या या मतदारसंघात भाजपला अद्याप यशाचे धनी होता आलेले नाही. यंदाही या मतदारसंघातून भाजपने उमेदवार देण्याची तयारी चालवली होती. तशी चर्चा स्थानिक पदाधिकाऱ्यांशीही करण्यात आली होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजपने या मतदारसंघातील आपला उमेदवार जाहीर केलेला नव्हता.
त्यामुळे भाजपच्या एकूणच भूमिकेकडे लक्ष लागून होते. या मतदारसंघात १९९० पासून भाजपने उमेदवार दिले. केवळ २०१४ मध्ये ही जागा शिवसेनेकडे होती. त्यावेळी शिवसेनेने मुस्लिम उमेदवार देऊनही त्याला अवघे १३७५ मिळाली होती. भाजपनेही २००९ मध्ये मुस्लिम उमेदवार देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला अवघी ७९५ मते घेता आली.
दरम्यान, भाजपकडून यंदा सुरेखा पाटील-भुसे यांनी अर्ज दाखल केला होता; परंतु शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना पक्षाकडून एबी फॉर्मच न मिळाल्याने अखेर त्यांचा अर्ज छाननीत बाद झाला आणि भाजपचीही या मतदारसंघातून 'एक्झिट' झाली. याचबरोबर साकीब अखलाक अहमद या उमेदवाराचे वय कमी असल्याने त्याचाही अर्ज बाद झाला. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना अवधी साडेचार हजार मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी तब्बल १ लाख ९८ हजार मते घेतली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत केवळ उमेदवार लढवून फजिती करून घेण्यापेक्षा भाजपने न लढण्याचीच भूमिका घेतली असावी.
महायुतीचा पाठिंबा कुणाला?
मालेगाव मध्य मतदारसंघात महायुतीचा उमेदवार नसणार हे आता स्पष्ट आले आहे. मतदारसंघात आता १६ उमेदवार असून सर्व मुस्लिम समाजाचे आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे एजाज बेग यांना उमेदवारी दिली आहे. तर समाजवादी पार्टीने देखील शान-ए-हिंद यांना उमेदवारी दिली आहे. 'एमआयएम'कडून आमदार मौलाना मुफ्ती पुन्हा नशीब आजमावत आहेत. तर माजी आमदार असिफ शेख हे त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाकडून लढत आहेत. उर्वरित १० अपक्ष आहेत. त्यामुळे महायुतीकडून कोणाला पाठिंबा दिला जातो, याची उत्सुकता वाढली आहे. मतदारसंघात तीन राष्ट्रीय पक्ष लढत देत असताना भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाने माघार घेतल्याने त्याचीही चर्चा सुरू आहे.
प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्यमधून भाजपचा उमेदवार रिंगणात असतो. यंदाही सुरेखा भुसे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे महायुतीकडून सांगण्यात आले होते; परंतु वरिष्ठ स्तरावर महायुतीकडून मध्यमधून उमेदवार न देण्याचे ठरले. त्यामुळे एबी फॉर्म मिळाला नाही. पक्ष देईल तो आदेश भा भाजप कार्यकर्ते पाळतील. - नीलेश कचवे, जिल्हाध्यक्ष, भाजप ग्रामीण, मालेगाव