लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव कॅम्प : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मालेगाव जिल्हानिर्मितीचा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन देत नाशिक जिल्हा सहकारी बँकेत खातेदारांचे अडकलेले दोन हजार कोटी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि. १७) मालेगाव येथे झालेल्या जाहीर सभेत दिली.
पोलिस कवायत मैदानावर मालेगाव बाह्य मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार दादा भुसे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीतील कामगिरीचा आढावा घेतानाच महाविकास आघाडीवर टीका केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले, ज्यांनी कोविडकाळात मोठा भ्रष्टाचार केला, ते घरात बसून राहिले व जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. आता ते काँग्रेसच्या मांडीवर बसून सत्तेची स्वप्ने पाहत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचा उद्धवसेनेला विसर पडला आहे. ज्या दिवशी शिवसेना काँग्रेससोबत जाईल त्या दिवसापासून आपली दुकानदारी बंद करू, असे बाळासाहेबांनी म्हटले होते; परंतु त्यांच्या विचारांना तिलांजली देत काँग्रेसचा हात पकडण्यात आला, असे सांगत शिंदे यांनी महायुती सरकारने राबविलेल्या विविध योजनांचाही आढावा घेतला.
मालेगाव बाह्य मतदारसंघात गेल्या वीस वर्षांत विकासकामांना गती मिळाली असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित मालेगाव जिल्हानिर्मितीचा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी शिंदे यांनी पक्षाच्या वचननाम्यावरही भाष्य केले. यावेळी दादा भुसे यांनीही विविध विकासकामांची माहिती दिली. सभेला मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी गर्दी केली होती. काहीकाळ वाहतूक कोंडी झाली.
...अभी तो पिक्चर बाकी है!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदगाव येथेही शिंदेसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानांचा समाचार घेतला. आम्हाला जेलमध्ये टाकण्याच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत; परंतु एकनाथ शिंदेला तुम्ही हलक्यात घेऊ नका, असा इशाराही त्यांनी दिला. दोन वर्षापूर्वी सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणलं. 'हा नुसता ट्रेलर आहे, अभी तो पिक्चर बाकी हैं,' असे सांगत शिंदे यांनी नांदगाव मतदारसंघाच्या गतिमान विकासाकडेही लक्ष वेधले.
नामको उलाढालप्रकरणी करेक्ट कार्यक्रम करू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव येथील नामको बँकेच्या शाखेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद आर्थिक उलाढालीवरही भाष्य केले. शिंदे म्हणाले, या संशयास्पद आर्थिक उलाढालीचा सखोल तपास करून लवकरच करेक्ट कार्यक्रम करू. यामध्ये दोषींना सोडले जाणार नाही. नाशिक जिल्हा सहकारी बँकेत खातेदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत, ते त्यांना मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असेही शिंदे यांनी सांगितले.