लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: गत विधानसभा निवडणुकीत अर्थात २०१९ मध्ये नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी तत्कालीन काँग्रेस आघाडीतील एकसंध राष्ट्रवादीने १० तर काँग्रेसने ५ जागा लढवल्या होत्या. त्यात राष्ट्रवादीला ६ आणि काँग्रेसला एकमेव जागेवर विजय मिळाला होता. गत वर्षभरात झालेल्या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून ५ जागा तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून ७ जागा लढविण्यात येत आहेत. तर काँग्रेसला गतवेळच्या पाच जागांच्या तुलनेत निम्म्याहून कमी अवघ्या २ जागाच वाट्याला आल्या आहेत.
गत विधानसभेच्या पंचवार्षिकात एकसंध राष्ट्रवादीने १० जागांवर उमेदवार उभे केले होते. त्या १० जागांपैकी ६ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट ६० टक्के होता. तर काँग्रेसला ५ जागांपैकी एकाच जागेवर विजय मिळवता आला असल्याने त्यांचा स्ट्राईक रेट २० टक्के इतकाच होता.
मात्र, राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर सर्वच्या सर्व ६ आमदार अजित पवार गटाकडे आल्याने शरद पवार गटाकडे सध्याच्या घडीला जिल्ह्यात एकही आमदार नाही. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात अजित पवार गटाला महायुतीकडून ७ जागा सुटल्या आहे. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने ५ जागांवर उमेदवारी पटकावत कळवणची एक जागा मित्रपक्ष माकपाला सोडली. म्हणजे एकप्रकारे राष्ट्रवादी शरद पवार गटाने जिल्ह्यात ६ जागाच मिळवल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या उमेदवारांविरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे ३ उमेदवार असे चित्र आहे.
त्यात येवल्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे, दिंडोरीत नरहरी झिरवाळांविरोधात शरद पवार गटाचे सुनीता चारोस्कर, आणि माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात उदय सांगळे असा तीन ठिकाणी राष्ट्रवादीचा आपापसात सामना आहे. तर अन्य चार जागांपैकी पुन्हा राष्ट्रवादीत परतलेले इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांना काँग्रेसच्या लकी जाधव, काँग्रेस बंडखोर निर्मला गावित तसेच मनसेचे काशिनाथ मेंगाळ यांच्याशी झुंजावे लागणार आहे.
कळवणमध्ये नितीन पवारांची लढत माकपाच्या जे. पी. गावित यांच्याशी, निफाडमध्ये दिलीप बनकर यांची लढत उद्धवसेनेच्या अनिल कदम यांच्याशी होणार आहे. तर सरोज अहिरे यांना उद्धवसेनेत दाखल झालेल्या योगेश घोलप यांच्याशी झुंजावे लागणार आहे.
गतवेळी काँग्रेस या पाच जागी लढली
गत निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी नाशिक मध्य, इगतपुरी, चांदवड, मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य या पाच जागांवर निवडणूक लढवली होती. त्या तुलनेत यंदा नाशिक मध्य इतकेच नव्हे तर मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्यदेखील काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या नाहीत. काँग्रेसचे जिल्ह्यातील अस्तित्व दोन जागांपुरते सीमित झाले असून त्यातही इगतपुरी काँग्रेसच्या लकी जाधव यांना काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला गावित यांनीदेखील आव्हान दिले आहे. चांदवडला जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार कोतवाल रिंगणात आहेत.