लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: महायुतीमधील सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिंदे सेना या दोन्ही पक्षांनी जिल्ह्यात दोन ठिकाणी उमेदवारांना ए बी फॉर्म दिल्याने कलह समोर आला आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिंदे सेनेने दिंडोरी आणि देवळाली या जागांवर उमेदवार जाहीर करुन त्यांना एबी फॉर्मही दिले आहेत. त्यामुळे येथे आधीच जाहीर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे उमेदवार अडचणीत येणार आहेत.
दिंडोरी आणि देवळालीच्या जागा महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्यात आल्या होत्या. त्यामुळे तेथे राष्ट्रवादीने अनुक्रमे नरहरी झिरवाळ व सरोज अहिरे या विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली होती. या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्जही दाखल केले होते. मात्र मंगळवारी शिंदेसेनेने दिंडोरी व देवळाली येथून अनुक्रमे धनराज महाले व राजश्री अहिरराव यांना एबी फॉर्मही दिले. त्यानंतर या दोन्ही उमेदवारांना घाइर्घाईने उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या दोन मतदार संघांमध्ये आता महायुतीचे दोन उमेदवार आमने सामने असणार आहेत. त्यामुळे माघार होईपर्यंत काय घडते व नक्की कोण रिंगणात राहते याकडे लक्ष लागून आहे.
येवला मतदारसंघात उद्धव सेनेच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये याआधीच महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे माणिकराव शिंदे यांनी अर्ज दाखल केलेला आहे.
विमानाने आणले एबी फॉर्म
नाट्यमय घडामोडींनी उमेदवारी दाखल करण्याचा दिवस गाजला. शिंदेसेनेने जिल्ह्यातील दोन एबी फॉर्मसाठी खास विमान पाठवले आणि यातील एक फॉर्म ओझर विमानतळावरच धनराज महाले यांनी दिले, तर दुसरा फॉर्म देण्यासाठी पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी शहरातील भरतनगर येथे पोहोचले आणि उमेदवारी दाखल करण्याची मुदत संपण्याच्या अवघ्या दोन ते तीन मिनिटे अगोदर राजश्री अहिरराव यांच्या अर्जाला एबी फॉर्म जोडला.