लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यावर ड्रग्ज संदर्भातील गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. वस्तुस्थिती मात्र तशी नसून, ड्रग्जमुक्त नाशिकसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन भाजप पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आमदार फरांदे यांनी ड्रग्ज पेडलर्सचे नाव, त्यांचे फोन नंबर्स, त्यासंदर्भातील पुरावे गृहखात्यास दिले. या प्रकरणाची गृहखात्याच्या माध्यमातून चौकशीदेखील करण्यास सांगितली. मात्र, तरीदेखील विरोधक त्यांच्या विरोधात फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. फरांदे यांनी नाशिक ड्रग्जमुक्तीसाठी पोलिसांकडे पाठपुरावा केला. विधिमंडळाच्या सलग चार अधिवेशनांमध्ये अतिशय प्रखरतेने मांडलेली भूमिका यामुळे ड्रग्जमाफियांना पळता भुई थोडी झाली होती.
सलग चार अधिवेशनांमध्ये प्रा. देवयानी फरांदे यांनी ड्रग्जमुक्त नाशिकसाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचं ठासून सांगितले. जुगार (बॉल गेम) यांसारखे अनैतिक खेळांचे अड्डे खुलेपणाने मुंबईनाका परिसरात सुरू आहे. हे अनैतिक धंदे पोलिस प्रशासनाला निदर्शनास आणून दिल्याचे आमदार फरांदे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच प्रा. फरांदे यांनी फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या समाजकंटकाविरोधात भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. शहरातील पक्षीय उमेदवारांचा अमली पदार्थांबाबत दाखल गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे आढळून आलेले नाही, असे दस्तुरखुद्द पोलिस आयुक्तांनीच स्पष्ट केले आहे.