लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात नाशिक पश्चिममध्ये उमेदवारांची संख्या वाढली असून सर्वाधिक बंडखोर व नाराजांची संख्या याच मतदारसंघात आहे. भाजपातील ९ माजी नगरसेवकांनी सीमा हिरे यांना विरोध करून पक्षालाच आव्हान दिले होते. परंतु त्यातील ७ जणांनी विरोधाची तलवार मान्य केली. फक्त दिनकर पाटील यांनी भाजपची साथ सोडत मनसेच्या इंजिनमध्ये बसणे पसंत केले. तर शशिकांत जाधव यांनीदेखील आपली उमेदवारी अखेर दाखल केलीच. जाधव यांना थांबविण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.
दुसरीकडे सुधाकर बडगुजर हे उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख असले तरी त्यांना भाजपच्या उमेदवार आमदार सीमा हिरे यांचे कडवे आव्हान असल्याने त्यांना आपल्याच मतदारसंघात अडकून राहावे लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निवडणूक आखाड्यात उद्धवसेना बडगुजर यांच्या ऐवजी कोणाच्या खांद्यावर अपेक्षांचे ओझे देणार? हेदेखील तितकेच महत्त्वाचे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे नाशिकमधील तिघा उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यांनी शहराध्यक्षांकडून परिस्थिती जाणून घेतली. त्यामुळेच उमेदवारीची भाषा बोलणाऱ्यांनी माघार घेणे पसंत केल्याची चर्चा पक्षात आहे.
मनसेला अपेक्षा, पण आव्हान
मनसेला नाशिक पश्चिम मतदार- संघात खूप मोठ्या अपेक्षा आहेत. कधीकाळी शहरात मनसेचे तीन आमदार अन् मनपातही पक्षाची सत्ता होती. मात्र नंतर शहरात मनसेची पडझड झाली. आताच्या निवडणुकीत मनसेला अपेक्षा आहे. लोकसभा अन् आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक असलेले दिनकर पाटील यांना मनसेने आपल्या पक्षात घेऊन डाव टाकला आहे. परंतु त्यांच्यासमोर बडगुजर अन् सीमा हिरे यांचे आव्हान असेल.
डी. एल. कराड ऐकेना
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या माकपाचे ज्येष्ठ नेते डॉ. डी.एल. कराड यांनीदेखील अर्ज दाखल केला असून त्यांनी माघार घेतली नाही तर महाविकास आघाडीचे सुधाकर बडगुजर यांची डोकेदुखी वाढेल. कराड यांच्या माघारीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र खरे चित्र माघारीच्या मुदतीनंतरच कळेल.